सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅकेने आपल्या कार आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवरील व्याजदरात बुधवारी कपात केली. कर्जावरील प्रोसेसिंग शुल्कही कमी करण्याचा निर्णयही बॅंकेने घेतला.
कार खरेदी करण्यासाठीच्या कर्जावरील व्याजदरात ०.२० टक्क्याने कपात करण्यात आली. या कर्जाचा नवा व्याजदर १०.५५ टक्के असेल. यापूर्वी तो १०.७५ टक्के होता. प्रोसेसिंग शुल्क कर्जाच्या रकमेच्या ०.५१ टक्क्यांवरून सर्वांसाठी ५०० रुपये इतके करण्यात आले आहे.
याआधी पंजाब नॅशनल बॅंक, ओबीसी आणि आयडीबीआय या बॅंकांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या व्याजदरात कपात केली आहे. आता स्टेट बॅंकेनेही व्याजदरात कपात करून या बॅंकांच्या स्पर्धेत उडी घेतलीये. ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजेच दूरचित्रवाणी संच, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजिरेटर इत्यादींच्या खरेदीवरील व्याजदरातही स्टेट बॅंकेने कपात केली आहे.