कर्ज वसूल न झालेल्या मालमत्तांचा ऑनलाइन लिलाव करण्याचा दुसरा फेरा बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँक येत्या १२ जूनपासून पुन्हा सुरू करणार आहे. बँकेकडे तारण असलेल्या ३०० मालमत्ता या देशव्यापी ई-लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत.
देशातील विविध ४० शहरांतील लिलाव करण्यात येणाऱ्या ३०० निवासी तसेच वाणिज्य मालमत्ता स्टेट बँकेकडून तिच्या संकेतस्थळावर नोंदविल्या जाणार आहेत. या मालमत्तांच्या लिलावातून बँकेला एकूण १,२०० कोटी रुपये वसुल होणे अपेक्षित आहे.
उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या मालमत्तांमध्ये घर, फ्लॅट, दुकान तसेच फॅक्टरी इमारतींचा समावेश आहे. या लिलावाबाबतची सूचना बँकेने शुक्रवारी अधिकृतपणे जारी केली.
बँकेने यापूर्वी, मार्च २०१५ मध्ये केलेल्या ई-लिलाव प्रक्रियेत १३० मालमत्तांच्या विक्रीतून १०० कोटी रुपये उभारले होते. ही प्रक्रिया यापुढे कायम सुरू राहील, असे बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी गेल्याच महिन्यात स्पष्ट केले होते. बँकेकडे तारण असलेल्या व त्यावरील कर्जाची वसुली न झालेल्या मालमत्तांचा लिलाव दर तिमाहीला होत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यानुसार प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या महिन्याच्या मध्याला लिलाव प्रक्रिया राबविण्याचा इरादाही बँकेने व्यक्त केला आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँकेने मार्च २०१५ अखेरच्या तिमाहीत ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) ४.२५ टक्के नोंदविले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत कोणतीही सहिष्णुता यापुढे बाळगली जाणार नाही आणि बँकांना त्यांच्या ताळेबंदावरील या अनुत्पादित मालमत्तांचा बोजा लवकरात लवकर स्वच्छ करावाच लागेल, असे गव्हर्नरांनी सरलेल्या मंगळवारी मध्यवर्ती बँकेचे पतधोरण मांडताना स्पष्ट निर्देश दिले आहेत.