जामिनासाठी लागणारी रक्कम मालमत्ता विक्रीतून उभी करण्यासाठी भागधारकांबरोबरची चर्चा गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेल्या सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रता रॉय यांना तुरुंगाच्या आवारातच करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. यानुसार रॉय यांना ही चर्चा नवी दिल्लीच्या तिहार तुरुंग परिसरातील संमेलन कक्ष अथवा अतिथीगृहात सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान करता येणार आहे. यासाठी रॉय यांना लागणाऱ्या मोबाइल फोन, लॅपटॉप आदी गॅझेटची माहिती न्यायालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे अदा न केल्याप्रकरणी मार्चपासून तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांच्या सुटकेसाठी १० हजार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी समूहाच्या विदेशातील मालमत्ता विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी रॉय यांनी केली होती. त्याकरिता नजरबंदीचा रॉय यांचा पर्याय न्यायालयाने नाकारला होता. समूहाची लंडन व न्यूयॉर्क येथील आलिशान हॉटेल विकण्यासाठी रॉय यांना इच्छुक खरेदीदारांसाठी चर्चा करण्यासाठी आवश्यक सुविधा तुरुंग परिसरात उपलब्ध करण्याची सूचना न्यायालयाने शासनाला केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा