आईच्या अंत्यविधीसाठी तुरुंगापासून मिळालेली महिन्याभराची सुटका सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासाठी विस्तारली आहे. रॉय यांना येत्या ११ जुलैपर्यंतचा पॅरोल सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच या कालावधीत सेबीला द्यावयाच्या २०० कोटी रुपयांची तजवीजही रॉय यांना करायची आहे.
मार्च २०१४ पासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांना गेल्याच आठवडय़ात चार आठवडय़ांकरिता पॅरोल मंजूर झाला होता. त्यांना आता सेबीकडे भरावयाचे २०० कोटी रुपये उभे करता यावे याकरिता तो आता आणखी महिन्याभरासाठी विस्तारण्यात आला आहे. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने रॉय यांना निधी उभारणीसाठी संधी दिली गेली पाहिजे, असे नमूद करत पॅरोल मंजूर केला. त्यांच्याबरोबर समूहाचे अशोक रॉय चौधरी यांनाही ही मुभा दिली गेली आहे.
रॉय यांच्या आई छाबी रॉय यांचे गेल्या गुरुवारी लखनऊ येथील निवासस्थानी वयाच्या ९५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारासाठी रॉय यांनी मागितलेल्या परवानगीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्यता दिली होती. मात्र रॉय यांना पॅरोल कालावधीत पोलिसांचे संरक्षण कायम राहणार आहे. ११ जुलैपर्यंत रॉय यांनी सेबीकडे २०० कोटी रुपये जमा न केल्यास त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा