भांडवली बाजाराच्या खुलाशाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ‘सेबी’ने रिलायन्स इंडस्ट्रीजवर १३ कोटी रुपयांचा दंड ठोठावणारा आदेश शुक्रवारी बजावला. २००७ ते २००९ दरम्यान रिलायन्सने समूहातील अन्य कंपन्यांना प्राधान्य तत्त्वावर वितरीत केलेल्या वॉरन्ट्सचे समभागांमध्ये परिवर्तन केले. तब्बल १२ कोटी वॉरन्ट्स समभागांमध्ये रूपांतरीत केले गेल्याने कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलातही स्वाभाविकपणे त्या प्रमाणात वाढ संभवते. परंतु कंपनीने त्या अनुरूप सौम्य झालेली प्रति समभाग मिळकत (ईपीएस) आपल्या ताळेबंदात दर्शविली नसल्याचा ‘सेबी’ने ठपका ठेवला होता. ‘‘कोणत्याही समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘ईपीएस’ हा एक निर्णायक निकष असल्याने, त्या संबंधाने उचित खुलासा न करणे म्हणजे गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासारखेच आहे,’’ असा ‘सेबी’ने हा दंडाचा आदेश देताना शेरा मारला आहे.  

Story img Loader