भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ने काही म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये वारंवार आवश्यक नियम आणि शर्तीचेही पालन होत नसल्यावर बोट ठेवले आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूकदारांची किमान संख्या २० असावी आणि योजनेतील एकूण मालमत्तेत एका गुंतवणूकदारांची २५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम असू नये या धाटणीची ‘२०-२५’ मूलभूत अटही पाळली जात नसल्याचे तिने स्पष्ट केले.  कोणतेही म्युच्युअल फंड घराणे, योजना अथवा अधिकाऱ्याचा नामोल्लेख न करता, सेबीने अनेक ठिकाणी विशेषत: प्रत्येक तिमाही दरम्यानच्या काळात कैक योजनांकडून ‘२०-२५’ अटीचे वारंवार उल्लंघन  होत असल्याचे म्हटले आहे. या योजनांचा वापर काही गुंतवणूकदार त्यांच्याकडील मोठय़ा रकमेला अल्पावधीसाठी आश्रय देण्यासाठी प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस ही रक्कम काढून घेतली जाते, तर अन्य काही योजनांमध्ये तिमाहीगणिक हा प्रघात सुरूच असल्याचे दिसून येते. सेबीच्या विश्लेषणामध्ये असे नियमांचे उल्लंघन एकाच गुंतवणूकदाराकडून नियमितपणे होत असल्याचाही उल्लेख आहे. संबंधित फंड घराण्यांना ही बाब लक्षात आणून दिली गेली असून, भविष्यात असे घडू नये याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ या प्रकारांची दखल घेण्यास सुचविण्यात आले आहे.