सहारा समूहाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात रिझव्‍‌र्ह बँकेनेही उडी घेतली असून समूहातील उपकंपनीच्या मालमत्ता विक्रीसाठी असलेला आपला आक्षेप सर्वोच्च न्यायालयात नोंदविला आहे. संबंधित बिगर वित्त कंपनीचे नियंत्रण आपल्याकडे असल्याचा दावा करत तिच्या मालमत्तेसह रोखेविक्री आदी प्रक्रियेत आपल्याला सहयोगी करून घेण्याची विनंती मध्यवर्ती बँकेने न्यायालयाला केली आहे.
सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपये उभारण्यासही सांगण्यात आले आहे. समूहातील मालमत्ता विकून रक्कम गोळा करण्याचा सेबीचा प्रयत्न सुरू असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने या व्यवहारात असलेली सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लि.बाबत शुक्रवारी आक्षेप घेतला. या वित्तसंस्थेचे नियंत्रण आपल्याकडे असून तिच्या संबंधी व्यवहारात आपल्याला सहभागी करून घ्यावे, अशी रिझव्‍‌र्ह बँकेची भूमिका आहे. गुंतवणूकदारांकडून या कंपनीद्वारे सहाराने पैसे गोळा केले आहेत.

Story img Loader