‘व्हॉट्स अॅप’सारख्या नव्या संपर्क माध्यमाद्वारे गुंतवणुकीसाठी समभाग सुचविणाऱ्यांवर भांडवली बाजार सेबीची करडी नजर असून, अशा व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एसएमएसद्वारे समभाग सुचविणाऱ्या गुंतवणूक सल्लागारांविरुद्ध यापूर्वी गुंवतणूकदारांना सावध करणाऱ्या सेबीने आता ‘व्हॉट्स अॅप’ या नव्या तंत्रज्ञानाकडे मोर्चा वळविला आहे.
या माध्यमातून संबधित संस्था गुंतवणूकदारांना तब्बल २०० पट परताव्याचे आमिष देत असून पैकी अनेक या नोंदणीकृतही नसल्याचे सेबीच्या निदर्शनास आले आहे. सेबीने याच आठवडय़ात गुजरातेतील दोन व्यक्तींबाबत असा प्रकार उघडकीस आणला. मन्सूर रफिक व फिरोज रफिक अशी या दोन भावांची नावे आहेत. हे दोघे ‘व्हॉट्स अॅप’द्वारे समभाग गुंतवणुकीत हमखास भरघोस परताव्याचे आमिष गुंतवणूकदारांना देत असत. तब्बल २०० पट परताव्यासाठी २५ हजार रुपये जमा करण्यासह त्यांच्याकडून सांगितले जात असे. विविध पाच मोबाइल क्रमांकाद्वारे गुंतवणुकीचे एसएमएस ते पाठवत. अनेक जाहिरातीच्या माध्यमातूनही त्यांनी ही मोहीम चालविली होती. महिन्याला २५ ते थेट ५० लाख रुपयेपर्यंत मिळकतीचे दावेही ते करत. एसएमएसमध्ये ते त्यांच्या गुंतवणूक सल्लागार सेवेसाठी नोंदणी करण्यासह सांगत. अशा नोंदणीकृत सदस्यांनाच ‘टिप्स’ पुरविण्याचा त्यांचा दंडक असे.
याबाबत गुंतवणूकदारांच्या तक्रारी सेबीकडे आल्या होत्या. सेबीने याबाबत केलेल्या चौकशीनंतर असे करण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्याबरोबरच त्यांची सर्व कागदपत्रेही आपल्या ताब्यात घेतली आहेत. तथ्य समोर येण्यापूर्वी सेबीने संबंधित व्यक्ती, त्यांची कार्यालये, संकेतस्थळ, संपर्क क्रमांक हे देखरेखीखाली ठेवले होते. सेबीने यापूर्वी २०१३ च्या अखेरीसही असाच एक प्रकार उघडकीस आणला होता. या दोन प्रकरणांचा एकमेकांशी असलेला संबंधही बाजार नियामक तपासून पाहत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा