वाढती निर्यात आणि सरकारने आवळलेले सोने आयातीवरील फास याचा चांगला परिणाम देशाच्या चालू खात्यावरील तूट कमी होण्यावर झालेला दिसून आला आहे. जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत तूट ५.२ अब्ज डॉलर राहिली असून, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत त्याचे प्रमाण १.२ टक्के राहिले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तूट २१ अब्ज डॉलर होती.
विदेशी चलनाचा देशाबाहेर जाणारा आणि येणारा ओघ म्हणून ओळखली जाणारी वाढती तूट सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्क्यांच्या आत आणण्याचे नवे उद्दिष्ट असताना जुलै ते सप्टेंबर २०१२ मध्ये ते तब्बल ५ टक्के होते. यंदाच्या याच कालावधीत ते ५.२ अब्ज डॉलर राहिले आहे.
मिळून चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अध्र्या वर्षांत तूट २६.९ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. उत्पन्नाच्या तुलनेत ती ३.१ टक्के आहे. वर्षभरापूर्वीच्या प्रमाणापेक्षा यंदा ते नक्कीच कमी (३७.९ अब्ज डॉलर व ४.५ टक्के) आहे.
तूट कमी करण्यासाठी सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या अनेक महिन्यांत कठोर उपाय योजले होते. यामध्ये निर्यातीला प्रोत्साहनबरोबरच सोन्यावरील वाढती आयात रोखण्यासाठी तिचे शुल्क १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासह त्यावरील र्निबधांचाही समावेश आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने तुटीचे लक्ष्य ५६ अब्ज डॉलर राखले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत तूट सर्वोच्च अशा ८८ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली होती. याच दरम्यान सोन्याची ८३५ टन आयात झाली होती. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतही तूट २१.८ अब्ज राहिली आहे. या कालावधीत सोने आयात १६.४ अब्ज डॉलर होती. दुसऱ्या तिमाहीतील तूट आशावादी असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader