आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये वाहन उत्पादन ६० टक्कय़ांनी घटण्याची भीतीदायक शक्यता मंगळवारी व्यक्त केली. सप्टेंबर महिन्यात कंपनी एकूण क्षमतेच्या ४० टक्केच वाहनांचे उत्पादन घेऊ शकेल. कंपनीने या महिन्यात वाहनांच्या किमतीही वाढविणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहनांच्या घडणीत महत्त्वपूर्ण असलेल्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या पूर्ततेत अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यात मारुतीच्या हरियाणा आणि कंत्राटी उत्पादनाचे केंद्र असलेल्या सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड (एसएमजी) या दोन्ही प्रकल्पांतील वाहनांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शकता आहे, असे कंपनीने भांडवली बाजार नियामकाला दाखल केलेल्या पत्रकात संगितले आहे.
सोमवारी कंपनीने अल्टोपासून एस-क्रॉसपर्यंतच्या विविध मॉडेलच्या किमती वाढवत असल्याचे म्हटले आहे. आयात मालाच्या किमती वाढल्याच्या परिणामी उत्पादन खर्चही वाढल्याने त्याचा भार ग्राहकांवर लादण्यावाचून पर्याय नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.