लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतानाच भांडवली बाजारातही या संभाव्य घटनाक्रमान भलताच उत्साह संचारला आहे. एप्रिल-मेमधील या निवडणुकीनंतर स्थिर सरकार येईल व अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल, या अंदाजानेच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात खरेदीचा मारा दुसऱ्या दिवशी जबरदस्त ठरला. गुरुवारचा विक्रम मोडीत काढत सेन्सेक्सने शुक्रवारी एकाच सत्रात तब्बल ४०५.९२ अंश झेप घेत मुंबई निर्देशांकाला थेट २१,९१९.७९ या सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सलग दुसऱ्या व्यवहारात ६,३०० पुढे राहताना सप्ताहअखेरच्या १२५.५० अंश वाढीने ६,५२५.६५ वर जाऊन पोहोचला.
डिसेंबरच्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट ०.९ टक्क्यांपर्यंत रुंदावल्याचे स्वागत भांडवली बाजाराने गुरुवारी २१,५०० पुढील विक्रमी वाटचाल नोंदवून केले होते. त्याचबरोबर निफ्टीनेही ६,३०० च्या पुढचा प्रवास ऐतिहासिक टप्पा म्हणून नोंदविला होता. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा तेजीकडे मार्गक्रमण करू लागेल, या गुंतवणूकदारांच्या आशेवर बाजार सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मकेच्या वारूवर स्वार झाला. (गुरुवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२७२.९३ कोटी रुपयांची खरेदी केली होती.) वधारणेसह चालू सप्ताहातील शेवटच्या दिवसाची सुरुवात २१,५३९.४४ ने केल्यानंतर सेन्सेक्स सत्र संपण्याच्या तोंडावर २१,९६०.८९ पर्यंत झेपावला. दिवसाची सुरुवात हा त्याचा सत्रातील नीचांक राहिला तर २१,९६०.८९ हा त्याचा व्यवहारातील उच्चांक राहिला. दिवसअखेर कालच्या तुलनेत ४०५.९२ अंश अशी घसघशीत भर नोंदवीत सेन्सेक्सने २१,९१९.७९ या विक्रमी टप्प्याला अखेर पार केले.
चालू खात्यावरील तूट नियंत्रणात असून देशाची अर्थव्यवस्था दीड वर्षांपूर्वीच्या कालावधीपेक्षा खूपच स्थिर आहे, या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विधानानेही भांडवली बाजाराला स्फुरण चढले. सेन्सेक्समधील २२ समभाग वधारले. त्यातही भेल, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांना मागणी राहिली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम, बँक, भांडवली वस्तू, तेल व वायू हे वरचढ ठरले. युरोपीय व आशियाई बाजारात मात्र शुक्रवारी संमिश्र वातावरण राहिले. विक्रम सर करणाऱ्या शेअर बाजाराने महिन्याच्या पहिल्या सप्ताहातच ८०० अंशांची कमाई केली. शुक्रवारच्या अनोख्या तेजीने गुंतवणूकदारही ८५ हजार कोटी रुपयांचे धनी बनले. २३ जानेवारीचा २१,३७३.६६ हा विक्रमी टप्पा गुरुवारी २१,५१३.८७ च्या उच्चांकासह पार केल्यानंतर सेन्सेक्सने अवघ्या एका दिवसात मोठी झेप २२ हजारानजीक जाणे पसंत केले आहे. मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सव्र्हिसेसचे रामदेव अगरवाल यांनी ‘सात वर्षांनंतर निफ्टीने ऐतिहासिक उच्चाकावरचा प्रवास निर्धोक पार केला आहे; दोन महिन्यांतील राजकीय घडामोडींबरोबरच कंपन्यांचे वित्तीय निष्कर्षही बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, असे म्हटले आहे.
तेजीच्या बाजारात आयटीची मात्र लोळण
प्रमुख भांडवली बाजार त्याच्या ऐतिहासिक उंचीवर असतानाच भक्कम परकी चलनाच्या जोरावर महसुलाची मदार असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी मात्र शुक्रवारी चांगलीच लोळण घेतली. प्रमुख आयटी समभाग ५ टक्क्यांपर्यंत आपटले. तर हा क्षेत्रीय निर्देशांक १.९७ टक्क्यांनी घसरला. आयटीसह औषधनिर्माण निर्देशांकही नकारात्मक स्थितीत राहिला. परकी चलन व्यवहारात रुपया भक्कम होत असतानाच अमेरिकन डॉलर मात्र रोडावू लागले आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला या चलनाच्या माध्यमातून ८० टक्क्यांहून अधिक महसूल मिळतो. डॉलरच्या तुलनेत रुपया ६१ पर्यंत उंचावल्याचा दबाव माहिती तंत्रज्ञान निर्देशांकावर निर्माण झाल्याचे बोनान्झा पोर्टफोलियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी म्हटले आहे.