नव्या सप्ताहाला भांडवली बाजार पुन्हा एकदा घसरणीच्या दिशेने फिरला. शतकाहूनही अधिक अंश घसरणीने सेन्सेक्स सोमवारी २४,८२५ वर येऊन ठेपला. तर ३७.५० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५६३.८५ वर थांबला.
मुंबई निर्देशांकाचा हा गेल्या १९ महिन्यातील नवा तळ होता. सेन्सेक्स यापूर्वी ४ जून २०१४ मध्ये २४,८०५.८३ या स्तरावर होता. व्यवहारात सेन्सेक्स २४,५९८.९० पर्यंत घसरला.
चीनच्या अर्थव्यवस्थेबाबतची चिंता कायम असून सोमवारी त्या देशातील महागाई दराने त्यात भर घातली. त्याचा परिणाम आशियाईतील प्रमुख निर्देशांक खाली येण्यावर झाला. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टीचाही समावेश राहिला.
गेल्या सहा सत्रात सेन्सेक्सने सोमवारच्या रुपात पाचवी घसरण नोंदविली आहे. शुक्रवारी किरकोळ वाढ नोंदवित मुंबई निर्देशांकाने सप्ताहअखेर तेजीत राखली होती.
मंगळवारपासून बाजाराचा प्रवास लक्षणीय ठरणार आहे. मुंबई शेअर बाजारातील आघाडीची सूचिबद्ध व देशातील पहिल्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसचे तिमाही निष्कर्ष मंगळवारी जाहीर होत आहेत. त्याचबरोबर इन्फोसिसचेही भविष्यकालीन आडाखे स्पष्ट होतील. सोबतच महागाई दर व औद्योगिक उत्पादन दर याचे ताजे आकडेही समोर येतील.
सोमवारी घसरलेल्या समभागांमध्ये सेन्सेक्समध्ये महिंद्र अॅन्ड महिंद्र, विप्रो, अदानी पोर्ट्स, भेल, डॉ. रेड्डीज, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, टीसीएस तसेच ओएनजीसी, सन फार्मा, एचडीएफसी, गेल, ल्युपिन, टाटा स्टील, इन्फोसिस यांचा समावेश राहिला.
तर मूल्य वधारलेल्या समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी अशा निवडक कंपन्यांचा क्रम राहिला. सेन्सेक्समध्ये केवळ ८ समभाग वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक कंपन्या, बँक निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही एक टक्क्य़ापर्यंत घसरले होते.
चिनी बाजार पडलेलाच..
बिकट आर्थिक वातावरणातून चीनमधील भांडवली बाजार अद्यापही बाहेर येण्यास तयार नाहीत. देशातील प्रमुख निर्देशांक नव्या सप्ताहारंभी तब्बल ५ टक्क्य़ांपर्यंत घसरले. शनिवारी जाहीर झालेल्या या देशाच्या डिसेंबरमधील १.६ टक्के महागाई दराची नवी चिंता बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारावर उमटली. नव्या वर्षांच्या प्रारंभाने समभागांवरील मर्यादा संपुष्टात आल्याने बाजारात गेल्या सोमवारी मोठय़ा प्रमाणात व्यवहार होऊन दोन वेळा ‘सर्किट ब्रेकर’ची क्रिया घडली. यानंतर चीनने ही तांत्रिक यंत्रणाच काढून टाकली. तरीदेखील निर्देशांकातील आपटी ५ टक्क्य़ांवर गेली आहे. सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथील निर्देशांक दोन टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर युरोपातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात तेजीसह झाली.