उणे स्थितीत गेलेले औद्योगिक उत्पादन, दुहेरी आकडय़ापर्यंत जाऊ पाहणारी महागाई आणि ऐतिहासिक टप्प्याला पोहोचलेली व्यापारी तूट अशा वातावरणाच्या छायेत लक्ष्मीची उपासना तरी कशी करायची, या विवंचनेने गुंतवणूकदारांनी ऐन मुहूर्ताच्या दिवशीही निरुत्साह दाखविल्याचे चित्र मुंबई शेअर बाजारात दिसले. नव्या २०६९ संवत्सरात काय वाढून ठेवले असेल, याच्या पुरती धास्तीने ७५ मिनिटे चाललेल्या मुहूर्ताच्या निस्तेज सौद्यांवर आशियाई तसेच युरोपीय भांडवली बाजारातील निराशेचे सावटही पहायला मिळाले. ‘सेन्सेक्स’सह ‘निफ्टी’ही ०.२९ टक्क्यापर्यंत खाली आला.
तब्बल पाच वर्षांनी सेन्सेन्सने पुन्हा एकदा मुहूर्ताच्या सौद्याला नकारात्मकता दाखविली आहे. ९ नोव्हेंबर २००७ मध्ये संवत्सर २०६४ ला प्रारंभकरतानाही सेन्सेक्स ०.७९ टक्क्यांनी घसरला होता. यानंतर मात्र सलग तीनही मुहूर्ताला तो एक टक्क्यापेक्षा कमी का होईना वधारला होता. तत्पूर्वी १४ नोव्हेंबर २००१ मध्ये ‘सेन्सेक्स’ मुहूर्ताच्या दिवशी १.७९ टक्क्यांनी खाली आला होता.
आर्थिक सुबत्तेचे प्रतीक समजले जाणाऱ्या दोन्ही प्रमुख भांडवली बाजारात मंगळवारी लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. दलाल स्ट्रीटवरील या १३३ वर्षे जुन्या मुंबई शेअर बाजाराला विशेष सजावटीने उत्सवी साज चढविला गेला होता. संवत्सर २०६९ च्या स्वागतपर मुंबई शेअर बाजारात दुपारी ३.३४ वाजता मुहूर्ताच्या सौद्यांना सुरुवात झाली. प्रारंभीचे काही क्षण ‘सेन्सेक्स’ ६० अंशांनी उंचावला होता. ०.३२ टक्के अशा नाममात्र वधारणेसह निर्देशांक यावेळी १८,७३०.५१ वर होता.
औषधी, सार्वजनिक तेल व वायू, पोलाद आदी क्षेत्रातील कंपन्यांची सुरुवातीला खरेदी होत होती. मात्र अवघ्या काही मिनिटातच घसरणीला सुरुवात झाली. मुहूर्ताचे सौदे संपण्याची वेळ सायंकाळी ५ ची होती. तत्पूर्वी अर्धा तास आधीच ‘सेन्सेक्स’ १८.६०० पर्यंत येऊन ठेपला होता. एचडीएफसी, इन्फोसिस, स्टेट बँक, भारती एअरटेल, रिलायन्स, ओएनजीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक या आघाडीच्या समभागांची विक्री केली गेली.
अखेर संवत्सर २०६९ चा पहिला दिवस ५१.४७ अंश घसरणीसह नोंदला गेला. १८,६१८.८७ वर मुंबई निर्देशांक स्थिरावला. १४.५५ अंश वाढीने व्यवहारांची सुरुवात करणारा ‘निफ्टी’ नव्या संवत्सराच्या सुरुवातीला ५,६९८.२५ पर्यंत होता. मात्र ‘सेन्सेक्स’सह ‘निफ्टी’ही नव्या संवत्सराला नकारात्मकतेकडे झुकला. येथेही माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, बँक क्षेत्रीय निर्देशांक घसरलेले होते. २०६८ संवत्सराच्या शेवटच्या तीन दिवसात मुंबई निर्देशांक २३२ अंशांनी घसरला होता. यापूर्वी २००७ मध्ये मुहूर्ताच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ अनुक्रमे १५० आणि ३६ अंशांनी खाली आले होते.
दिपावलीनिमित्त उद्या, बुधवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत. देशातील प्रमुख भांडवली, वायदे बाजारांसह सराफा, विदेशी चलन व्यवहारही उद्या होणार नाहीत. गुरुवारी बाजार नेहमीप्रमाणे सुरू असतील.
प्रमुख निर्देशांक
सेन्सेक्स -०.२८%
निफ्टी -०.२९%
बीएसई मिडकॅप ०.७४%
बीएसई स्मॉलकॅप १.२४%
सीएनएक्स मिडकॅप ०.६६%
निफ्टी ज्युनियर ०.०५%
सीएनएक्स ५०० ०.०५%