मंगळवारी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदराबाबत काय निर्णय होतो यावर नजर ठेवून गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी भांडवली बाजारात निराशाजनक व्यवहार नोंदविले. परिणामी, गेल्या आठवडय़ात सर्वोच्च टप्प्यावर पोहोचलेल्या सेन्सेक्ससह निफ्टीनेही अखेर माघार घेतली. १३४.३७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,५०० वर, २८,५५९.६२ पर्यंत आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२.३५ अंश घट नोंदवीत ८५०० नजीक, ८५५५.९० वर स्थिरावला.
गेल्या तिन्ही व्यवहारांत प्रमुख निर्देशांक वधारले होते. गुरुवारी उशिरा छोटय़ा वित्तसंस्थांसाठी नव्या बँक परवान्यांची मार्गदर्शक तत्त्वे रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केल्यानंतर सप्ताहअखेर मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराने ऐतिहासिक टप्पा राखला होता. सेन्सेक्स यावेळी २८,५००च्या पुढे, तर निफ्टी ८५०० हून अधिक नोंदला गेला होता. शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूदारांनीदेखील ९३५.८६ कोटी रुपयांची खरेदी केली. तर मुंबई शेअर बाजाराने इतिहासात प्रथमच १०० लाख कोटी रुपयांची उलाढाल पार पाडली होती.
सोमवारी मात्र गेल्या चार सत्रातील पहिला नकारात्मक प्रवास नोंदविला गेला. मध्यवर्ती बँकेचे तिमाही पतधोरण मंगळवारी जाहीर होत आहे. यंदा गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे स्थिर व्याजदर ठेवण्याची अटकळ अधिक असल्याने गुंतवणूकदारांनीही त्याच अंदाजावर समभागांच्या विक्रीचे धोरण सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी अनुसरले. सुरुवातीच्या तेजीमुळे २८,८०९.६४ पर्यंत गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर मात्र शुक्रवारच्या तुलनेत खाली आला. नोव्हेंबरमधील निर्मिती क्षेत्राने दोन वर्षांनंतर चांगली कामगिरी बजाविल्याचा परिणाम व्यवहारातील तेजीवर नोंदला गेला होता. सत्रात निफ्टीनेही ८६२३ हा सर्वोच्च टप्पा राखला.
मुंबई शेअर बाजारात तेल व वायू, ऊर्जा, पोदाल, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान समभागांना अधिक मूल्य प्राप्त झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग घसरले. घसरणीत तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी, ओएनजीसीचा समभाग सर्वाधिक ३.९८ टक्क्य़ांनी आपटला.
गेल्या सलग तीन व्यवहारातील सेन्सेक्सची वाढ ३५५.९४ अंश राहिली आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने २८,८२२.३७ हा व्यवहारातील तर २८,६९३.९९ हा बंदअखेरचा सर्वोच्च टप्पा नोंदविला आहे.
सिटी ग्रुपचा विश्वास ; वर्षभरात सेन्सेक्स ३३ हजार; तर निफ्टी ९८५० पर्यंत
सर्वोच्च टप्प्यानजीक असणारा सेन्सेक्स येत्या वर्षभरात ३३ हजारी मजल मारेल, असा विश्वास सिटी ग्रुपने व्यक्त केला आहे. तर निफ्टीचा डिसेंबर २०१५ पर्यंतचा स्तर हा ९८५० असेल असेही नमूद करण्यात आले आहे. सध्या दिसत नसली तरी भविष्यात व्याजदर कपातीची अपेक्षा असून त्या जोरावरच २०१५ हे एक चांगले वर्ष म्हणून साजरे होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय वित्तसमूहाने व्यक्त केली आहे. लवकरच जाहीर होणारी व्याजदर कपात ही भांडवली बाजारात इंधनाचे कार्य करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सातत्याने घसरत असलेल्या महागाईमुळे २०१५ मध्ये पाऊण टक्क्य़ाने व्याजदर कमी होतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
२०१४ मध्ये सेन्सेक्स आतापर्यंत ७२६८.२३ अंशांनी वधारला असून टक्केवारीत ती वाढ ३४.३३ टक्के असल्याचेही समूहाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा