सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबविताना मुंबई निर्देशांकाने गुरुवारी २७ हजारांपुढील प्रवास पुन्हा एकदा नोंदविला. जागतिक शेअर बाजाराच्या तेजीच्या वातावरणावर सेन्सेक्स २३०.४८ अंश वाढीसह २७,०१०.१४ वर पोहोचला. तर ७१.६० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१७९.५० पर्यंत गेला.
गेल्या सलग तीन घसरणींनंतर गुरुवारच्या सत्राची सुरुवात सेन्सेक्सने २६,८४२.१९ पर्यंत वाढ नोंदवीत केली. व्यवहारात मुंबई निर्देशांक २७ हजारांपुढे जाताना २७,०३७.९५ पर्यंत झेपावला.
गेल्या तीन व्यवहारातील सेन्सेक्समधील आपटी ही ३०० हून अधिक अंशांची होती. तिला जवळपास त्याच प्रमाणातील एकाच सत्रातील तेजीने खीळ बसली.
मुंबई शेअर बाजारात वाहन क्षेत्राची कामगिरी सर्वाधिक २.३३ टक्क्यांसह चमकदार राहिली. त्यातही थेट ८ टक्क्यांसह टाटा मोटर्स उंचावला. कंपनीच्या जग्वार लॅन्ड रोव्हने सप्टेंबरमध्ये ३ टक्के वाहनविक्री नोंदविल्याचा हा परिणाम होता. त्याचबरोबर मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांनीही तेजीत साथ दिली. आठवडय़ावर येणाऱ्या दसऱ्याला असलेल्या मागणीच्या आशेने हे समभाग वाढले.
एकूण शेअर बाजार घसरत असताना तेजी नोंदविणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने गुरुवारी हा क्रम तोडला. आयटी निर्देशांकात ०.१४ टक्के घसरण झाली. सेन्सेक्सच्या वाढीस भेल, टाटा स्टील, गेल, कोल इंडिया, ओएनजीसी, स्टेट बँक, ल्युपिनचे योगदान राहिले. तर महिंद्र, विप्रो, हिंदाल्को, हिंदुस्थान युनिलिव्हर, सिप्ला, एनटीपीसी, टीसीएस, इन्फोसिस रोडावले. सेन्सेक्समधील २१ समभागांनी वाढ नोंदविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा