सलग सहा व्यवहारात घसरणीनंतर काल मोठी तेजी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवातही २१ हजाराचा टप्पा गाठत केली; मात्र अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या रोखे खरेदीत १० अब्ज डॉलर इतक्या कपातीच्या निर्णयाची मुंबई शेअर बाजाराने लागलीच धास्ती घेतली. दिवसअखेर १५१.२५ अंशाने खाली येत सेन्सेक्स २०,७०८.६२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ५०.५० अंश घसरणीसह ६,१६६.६५ वर स्थिरावला.
रिझव्र्ह बँकेच्या स्थिर व्याजदराच्या निर्णयाचे स्वागत करत भांडवली बाजाराने बुधवारी गेल्या सहा सत्रातील घसरण २४८ अंशांनी मोडून काढली. मात्र त्याने या कालावधीत २१ हजाराला स्पर्श केला नव्हता. अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने फेडरल रिझव्र्हने रोखे खरेदी आवरती घेऊन ते प्रमाण मासिक ८५ अब्ज डॉलरवरून पुढील महिन्यापासून ७५ अब्ज डॉलपर्यंत खाली आणले. या निर्णयासाठी गेले दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर आशियाई बाजारात उत्साह संचारला. चीन आणि हॉँगकाँग वगळता येथील निर्देशांकांमध्ये तेजी होती. (भारतीय भांडवली बाजाराच्या व्यवहारानंतर सुरू झालेले अमेरिका, युरोपमधील बाजारही सुरुवातीला तेजी नोंदवीत होते.) याच जोरावर सेन्सेक्सने गुरुवारी थेट २१,०१७.४५ पर्यंत धडक दिली. नंतर मात्र तो घरंगळत गेला. २०,६४६.०३ हा त्याचा सुरुवातीचा व्यवहारातील नीचांक दिवसाचाही तळ ठरला. दिवसातील निर्देशांक फरक जवळपास ३५० अंशांचा राहिला. फेडरलमुळे उद्भवणाऱ्या संकटाचा सरकार योग्यरीतीने सामना करेल, या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आश्वासक विधानानंतर सेन्सेक्स दिवसअखेर काहीसा सावरत मात्र २१ हजारांच्याच खाली विसावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समधील घसरण १५० हून अधिक अंशांची राहिली.
बुधवारी तेजीवर स्वार झालेले बँक समभागांनी गुरुवारी विक्रीचे धोरण अवलंबिले. त्याला भांडवली वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी साथ दिली. रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, हीरो मोटोकॉर्पसह सेन्सेक्समधील १९ कंपनी समभागांचे मूल्य घसरले.
डॉलरला मजबूती तर रुपया घसरणीला
भारतीय चलनातील कमकुवता सलग विस्तारत चालली असून, गुरुवारी स्थानिक चलन अमेरिकन डॉलरच्या समोर आणखी पाच पैशांनी झुकले. दिवसअखेर रुपया ६२.१४ वर स्थिरावला. परकी चलन व्यवहारात रुपया ६२.४८ च्या नीचांकाला आला. रुपया बुधवारच्या व्यवहारातही ८ पैशांनी रोडावत ६२ च्या खाली, ६२.०९ पर्यंत आला होता. बुधवारी मध्य तिमाही पतधोरण जाहीर करताना रुपयाची सध्याची पातळी समाधानकारक असल्याचे विधान रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केले होते. रोखे खरेदीचा निर्णय आटोपशीर घेण्याच्या फेडरल रिझव्र्हमुळे आयातदारांनी सलग दुसऱ्या दिवशी डॉलरची वाढती मागणी नोंदवीत रुपयातील घसरण कायम ठेवली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2013 रोजी प्रकाशित
बाजाराच्या जिव्हारी
सलग सहा व्यवहारात घसरणीनंतर काल मोठी तेजी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवातही २१ हजाराचा टप्पा गाठत केली
First published on: 20-12-2013 at 08:20 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex and rupee price goes down