मुंबई शेअर बाजाराने सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविताना गुरुवारी गेल्या २८ महिन्यांचा नवा उच्चांक स्थापन केला. दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांक दिवसअखेर किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये ३४.३७ अंश वाढ होऊन मुंबई निर्देशांक २०,२४७.३३ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.१५ अंश वधारणेसह ६,१६९.९० पर्यंत पोहोचला.
बाजारातील व्यवहार सकाळी सुरू झाल्यापासूनच काल उंचावलेल्या समभाग मूल्यांचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी दिवसभर अविरत नफावसुलीचा कल कायम ठेवला. व्याजदर कपातीच्या आशेवर वाढत असलेल्या बाजारात युरोपातील नरम बाजारामुळे कालच्या तुलनेत किरकोळ वाढ नोंदविता आली. तरीदेखील बाजार जानेवारी २०११ नंतरच्या वरच्या टप्प्यावर बंद झाला. बांधकाम, तेल व वायू, आरोग्य, बँक या क्षेत्रातील समभागांमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निधीचा ओघ कायम ठेवला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार त्यांनी आज एकाच दिवसात १,६४६.९५ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. दोन सत्रातील मिळून सेन्सेक्सची भर ५२१ अंशांची आहे. सेन्सेक्समधील १४ समभागांचे मूल्य उंचावले. व्याजदराशी निगडित अनेक समभाग व क्षेत्रीय निर्देशांक वधारले होते.
निफ्टी निर्देशांकाचा चढता क्रम आगामी कालावधीतही कायम राहण्याची शक्यता आहे. यातून निफ्टी ६,२२५ ते ६,१३६ या स्तरावर असेल. जागतिक बाजारात युरोपीय तसेच अमेरिकन बाजार नकारात्मक स्थितीत असताना, बाजारात आजही बांधकाम, बँक असे व्याजदराशी निगडित समभाग उंचावले हे विशेष.
’ अलेक्स मॅथ्यूज,
संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्र्हिसेस.