गेल्या आठवड्यातील वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. २३ हजारांचा टप्पा पार करून निर्देशांक सोमवारी आत्तापर्यंतचा सर्वाधिक २३,५५१ अंशावर बंद झाला. निर्देशांकात दिवसभरात ५५६.७७ अंशांची वधारणा झाली. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ४१ मतदारसंघात सोमवारी मतदान होते आहे. येत्या शुक्रवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली मजबूत सरकार येईल, अशी हवा निर्माण झाल्याचा परिणाम गेल्या आठवड्यापासून निर्देशांकावर पाहायला मिळतो आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचा शेअर खरेदी करण्याकडे कल होता. त्याचा परिणाम निर्देशांक वधारण्यात झाला. निर्देशांक निश्चित करणाऱया ३० कंपन्यांपैकी २५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अॅंड टी, एचडीएफसी बॅंक, आयटीसी या सर्वांच्या निर्देशांकात वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सोमवारी १५५.४५ अंशांनी वधारणा झाली. निफ्टी सोमवारी आतापर्यंतचा सर्वाधिक ७,०१४.२५ अंशांवर बंद झाला.

Story img Loader