निर्देशांकाची सुरुवातीची नरमाई तेजीत परावर्तित
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात कमालीची घसरण नोंदली गेली. आशियाई बाजारातील हा परिपाक असतानाच दुपारच्या व्यवहारानंतर सावरलेल्या महागाई दरामुळे प्रमुख निर्देशांकांत दिवसअखेर मात्र तेजी नोंदली गेली. परिणामी सेन्सेक्स त्याच्या गेल्या दोन महिन्यांच्या तळातून बाहेर आला; तर निफ्टीला ७,८०० वरील स्तर राखण्यात यश आले.
१४९.५७ अंश वाढीसह सेन्सेक्स दिवसअखेर २५,७६०.१० वर बंद झाला. तर ४४.३५ अंश वाढीमुळे निफ्टीला ७,८०६.६० पर्यंत मजल मारता आली. दिवसअखेरच्या तेजीमुळे दोन्ही निर्देशांकांना दोन महिन्याच्या नीचांकातून बाहेर येता आले. तसेच गेल्या आठ सत्रातील दुसरी वाढ नोंदविता आली.
फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यांची धास्ती घेत प्रमुख आशियाई बाजारात सप्ताहारंभी घसरणीचे वातावरण होते. यामुळे मुंबई शेअर बाजाराने व्यवहाराची सुरुवात शतकाहून अधिक अंश घसरणीने केली. सेन्सेक्स यावेळी २५,५०० च्याही खाली उतरला होता. तर ४० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी याप्रसंगी ७,७०० वर प्रवास करत होता. गेल्या सप्ताहातील शेवटच्या व्यवहारापूर्वी, शुक्रवारपूर्वी सेन्सेक्समध्ये २५६ अंश घसरण नोंदली गेली होती. दुपारनंतर गेल्या महिन्यातील घाऊक महागाई दर सावरल्याची आकडेवारी जाहीर होताच बाजारात सोमवारच्या सत्रात पुन्हा तेजीचे व्यवहार सुरू झाले. परिणामी सेन्सेक्स व्यवहारात २५,८६६.४२ वर तर निफ्टी ७,८३८.८५ पर्यंत झेपावला.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर पतधोरणाची प्रतिक्षा असलेल्या गुंतवणूकदारांनी व्याजदर निगडित समभागांची विक्री केली. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दर किरकोळ वधारला असला तरी सलग १२ व्या महिन्यात तो उणे स्थितीत असल्याची आश्वासक प्रतिक्रिया बाजारात दिवसअखेर उमटली.
सेन्सेक्समध्ये गेल, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज, स्टेट बँक, वेदांता, आयटीसी यांचे समभाग मूल्य उंचावले. प्रमुख मुंबई निर्देशांकातील एकूण २२ समभाग तेजीच्या यादीत राहिले.
एस एच केळकरची सुगंधी दस्तक
सोमवारी भांडवली बाजारात दस्तक देणाऱ्या एस एच केळकर अ‍ॅन्ड कंपनीचा समभाग जारी किंमतीपेक्षा १५ टक्क्य़ांनी अधिक प्रतिसाद देणारा ठरला. सुगंधी द्रव्य निर्मिती क्षेत्रातील या कंपनीचा समभाग २२२ रुपयांवर मुंबईच्या शेअर बाजारात येत सत्रात २२२.७० पर्यंत उंचावला. कंपनीने जारी केलेल्या १८० रुपये मूल्यांच्या तुलनेत दिवसअखेर समभाग १५.१६ टक्क्य़ांनी उंचावत २०७.३० रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजारमूल्य पहिल्या दिवशी २,९९७.९९ कोटी रुपये निश्चित झाले. ५०० कोटी रुपयांच्या भागविक्री प्रक्रियेसाठीच्या कंपनीच्या समभाग नोंदणीस गेल्या महिन्यात २७ पट प्रतिसाद मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा