भांडवली बाजारातील घसरण गुरुवारी विस्तारात प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून दूर घेऊन गेली. २३१.२३ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २६ हजाराचा टप्पा सोडताना २५,८८६.६२ वर येऊन ठेपला. तर ६७.२० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,९०० चा स्तर सोडत ७,८६४.१५ वर दिवसअखेर विराम घेतला.
सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने सत्रातील पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी अनुभवली. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी व्याजदर वाढीचे संकेत दिल्याचा अधिक परिणाम येथील बाजारातील व्यवहारांवर झाला. आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. तर युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सहकार्याच्या अपेक्षेने युरोपीय बाजारात सुरुवातीला तेजीचे वातावरण होते.
गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारापासूनच बाजारात घसरण सुरू होती. सकाळच्या सत्रात शतकी घसरणीने सेन्सेक्सने २६ हजाराचा टप्पा सोडला. तर ३७ अंश घसरणीने निफ्टी या वेळी ७,९०० च्या खाली प्रवास करत होता.
व्यवहारात मुंबई निर्देशांकाने २५,८५७.३५ चा तळ गाठला. व्यवहारअखेरची सेन्सेक्सची अडीचशेहून अधिक अंशांची घसरण ही १८ नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी ठरली. गेल्या दोन सत्रांतील मिळून निर्देशांकातील घसरण आता २८२.७९ अंशांची झाली आहे. निफ्टीचा सत्रातील प्रवास ७,९१२.३० ते ७,८५३.३० असा उतरता राहिला. २.६५ टक्के घसरणीसह सेन्सेक्समध्ये ओएनजीसी हा सर्वात पुढे राहिला. ल्युपिन, भेल, वेदांता, आयटीसी, महिंद्र अॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक यांनीही दोन टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली. चेन्नईमधील पुराचा फटका बघता गुंतवणूकदारांनी विशेषत: वाहन व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची अधिक विक्री केली.
सेन्सेक्समधील केवळ पाच समभागांचेच मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद, सार्वजनिक उपक्रम, आरोग्य निगा यांचा घसरणीत अग्रक्रम राहिला.
घसरण विस्तारली : सेन्सेक्स २६ हजाराखाली
सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने सत्रातील पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी अनुभवली.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 04-12-2015 at 00:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex below 26000 mark