अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांकडून चिंता व्यक्त
सलग सहाव्या व्यवहारात घसरण नोंदविताना नव्या सप्ताहाची निराशाजनक सुरुवात करताना सेन्सेक्स सोमवारी २६,५०० हजारावर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,०५० चा स्तर अनुभवला.
९७.६८ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २६,५५९.१५ वर तर ८.५९ अंश घसरणीमुळे निफ्टी ८,०५० वर थांबला. प्रमुख निर्देशांकांची ही १ ऑक्टोबरनंतरची किमान पातळी राहिली. जूनमध्येही निर्देशांकांनी सलग सहा व्यवहारातील घसरण नोंदविली होती. गेला आठवडाभर भांडवली बाजार घसरता राहिला आहे. नव्या सत्पाहाची सुरुवातही मुंबई निर्देशांकाने घसरणीसह केली. सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाही निष्कर्षांने निराशा केल्याने तसेच सोमवारी ऑक्टोबरमधील देशातील निर्मिती क्षेत्र हे ५०.७ टक्क्य़ांसह २२ महिन्यातील तळात विसावल्याची चिंता विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही व्यक्त केली. परिणाम व्यवहारात सेन्सेक्स व्यवहारात २६,३७८.२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीने सोमवारच्या व्यवहारात ८ हजाराखालील प्रवासही नोंदविला. सत्रात तो ७,९९५.६० पर्यंत घसरला. जागतिक बाजारातही सप्ताहारंभी फारशी तेजी उमटली नाही.
गेल्या सहा व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांक ९११.६६ अंशांनी घसरला आहे. तर या सहा व्यवहारानंतर सेन्सेक्सने जूननंतरची सर्वात मोठी सलग आपटी अनुभवली आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये बजाज ऑटो, टाटा स्टील, वेदांता, एचडीएफसी, सन फार्मा, सिप्ला, लार्सन अॅन्ड टुब्रो यांचे समभाग मूल्य घसरले. तर मारुती सुझुकी, महिंद्र अॅन्ड महिंद्र, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स यांना मागणी राहिली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक, १.२७ टक्क्य़ांसह घसरणीत आघाडीवर राहिला. पाठोपाठ भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, ऊर्जा क्षेत्र नकारात्मक स्थितीत बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक संमिश्र हालचाल नोंदविणारे ठरले.
विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा रोडावला
गेल्या सलग काही सत्रातील भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा काढत्या पायामुळे प्रमुख निर्देशांक हे त्यांच्या महिन्याभराच्या तळात विसावले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत महत्त्वाचे मानले जाणाऱ्या या गुंतवणूकदारांनी निफ्टीच्या सूचितील ३५ कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार, एकूण ५० कंपन्यांमधील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा हिस्सा स्थिर २८.६ टक्के राहिला आहे. एकूण भांडवली बाजारातील दुसऱ्या तिमाहीतील विदेशी गुंतवणूक १८,००० कोटी रुपयांनी कमी झाली आहे. ती आधीच्या, पहिल्या तिमाहीपेक्षा २,६०० कोटी रुपयांनी अधिक आहे. या तिमाहीत निफ्टीतील ४१ कंपन्यांमधील गुंतवणूक विदेशी संस्थागतांनी काढून घेतली होती. दुसऱ्या तिमाहीत या गुंतवणूकदारांची पसंती असलेले निफ्टीतील इंडसइंड बँक, इंडियाबुल्स हाऊसिंग, ग्रासीम, नेस्ले, बीपीसीएल हे तर विक्रीसाठी अॅक्सिस बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया हे समभाग ठरले आहेत.