‘मोदी लाटे’चा पूर्ण विलय
भांडवली बाजारातील ‘मोदी लाट’ अखेर २० महिन्यांत ओसरली आहे. भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकार स्थापनेपूर्वीची स्थिती गेल्या सातत्यातील प्रमुख निर्देशांकांच्या आपटीने अवतरली आहे. बुधवारी ४००हून अंशांच्या आपटीच्या रूपात २०१६ मधील सर्वात मोठी घसरण नोंदविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी २४ हजारांच्या खाली अवतरला. तर देशातील सर्वात मोठय़ा बाजाराच्या, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही त्याचा ७,३००चा स्तर सोडला.
जवळपास शतकी घसरणीसह- ९९.८३ अंश घसरणीने सेन्सेक्स २३,९६२.२१ वर तर ३२.५० अंश आपटीने निफ्टी ७,२७६.८० पर्यंत येऊन ठेपला.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप २८ डॉलर दरम्यान प्रवास करत असल्याची धास्ती जगभरातील प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसऱ्या दिवशीही ३ टक्क्यांपर्यंतच्या आपटीने दाखविली. लंडनच्या बाजारात खनिज तेलाचे दर आता सावरताना दिसत आहेत, तर भारतात परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाने अखेर ६८चा तळ गाठल्यानंतर येथील भांडवली बाजारांनाही घसरणीकडे नेले. स्थानिक चलनाने व्यवहारात ६८.११ असा गेल्या २९ महिन्यांतील तळ गाठला.
बुधवारच्या ४००हून अधिक अंश घसरणीनंतर गुरुवारची मुंबई निर्देशांकाची सुरुवात तेजीसह झाली. त्यानंतर सेन्सेक्समध्ये अडीचशेहून अधिक अंशांची भर पडली होती. निर्देशांक याप्रसंगी २४,३५०च्या पुढे गेला होता. कंपन्यांच्या तिमाही निकालाचे स्वागत या वेळी होत होते. मात्र हे चित्र फार कालावधीसाठी राहू शकले नाही. त्यात घसरण होताना सेन्सेक्स तर २४ हजारांच्याही खाली आला. सत्रात २३,८६२ पर्यंत घसरल्यानंतर तो अर्धा टक्के घसरणीसह २४ हजारांखालीच राहिला.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये गुरुवारी संमिश्र वातावरण दिसले. मिड कॅप ०.३० टक्क्यांनी घसरला, तर स्मॉल कॅप ०.५३ टक्क्यांनी वाढला.
मुंबई निर्देशांकाने यापूर्वी १५ मे २०१४ रोजी २४ हजारांखालील नोंद केली होती. १६ मे २०१६ रोजी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे जाहीर झाले होते. या दिवशी सेन्सेक्स २४,१२१.७४ वर राहिला होता. यानंतर २७ जानेवारी २०१५ पर्यंत तो विस्तारत थेट २९,५७१.०४ पर्यंत पोहोचला होता. गुरुवारी निफ्टीने ७,३००चा स्तर सोडताना त्याचा ३० मे २०१४ नंतरचा तळ राखला.
वाढीव तिमाही नफ्याच्या जोरावर बुधवारी झेपावलेला रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग गुरुवारी मात्र गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने २ टक्क्यांपर्यंत घसरला, तर हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभाग मूल्यात २.४ टक्केघसरण झाली. सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरले. यात मारुती सुझुकी, कोल इंडिया, टाटा मोटर्स, सन फार्मा, ओएनजीसी, सिप्ला हेही सहभागी झाले.
ऊर्जा, वाहन, तेल व वायू, आरोग्यनिगा, पोलाद, भांडवली वस्तू, बँक हे निर्देशांक घसरणीत सर्वात पुढे राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा