सप्ताहारंभी सेन्सेक्समध्ये तेजी; निफ्टी ७,८०० पार
भांडवली बाजारातील तेजी नव्या सप्ताहारंभी पुन्हा राखली गेली. २१६.६८ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,७३५.९० पर्यंत गेला. तर ७२.५० अंश वधारणेने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला त्याचा ७,८०० चा टप्पा सहजच पार करता आला. प्रमुख निर्देशांक दिवसअखेर ७,८३४.४५ वर झेपावला. बँक, पोलाद तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीच्या जोरावर दोन्ही निर्देशांकांना जवळपास एक टक्क्य़ापर्यंतची वाढ सोमवारी नोंदविता आली.
बाजारातील सुरुवातीचे व्यवहार काहीसे घसरणीचे होते. राज्यसभेत मंजुरीसाठी रखडलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाचा हा परिणाम होता. मात्र आशियाई तसेच युरोपीय बाजारातील तेजीच्या जोरावर येथेही वाढ नोंदली गेली. संसदेत दिवाळखोरी विधेयक मंजूर झाल्याचे बाजारात वाढत्या तेजीच्या रुपात स्वागत केले गेले. डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्या व्यवहारात भक्कम होत असलेल्या रुपयाचेही पडसाद निर्देशांक वाढीने नोंदले गेले.
गेल्या सप्ताहाची अखेर करताना सेन्सेक्सने शुक्रवारी पाच व्यवहारात प्रथमच घसरण नोंदविली होती. संसदेत सादर करण्यात आलेल्या मध्य आर्थिक वर्षांच्या आढाव्यात एकूण चालू आर्थिक वर्षांसाठीचा विकास दर ७ ते ७.५ टक्क्य़ांपर्यंत खुंटविण्यात आल्याची ही छाया होती. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ६.९९ कोटी रुपयांचे समभाग विकले होते.
सोमवारी मात्र सेन्सेक्ससह निफ्टीत लक्षणीय निर्देशांक भर राखली गेली. राष्ट्रीय शेअर बाजारच्या निफ्टी सप्ताहारंभी ७,८०० च्या फार पुढे गेला.
सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, आयटीसी, महिंद्र अॅन्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक, स्टेट बँक हे आघाडीवर राहिले. तर सन फार्माबरोबर गेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एशियन पेन्ट्स हे घसरणीच्या क्रमवारीत राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक, १.४७ टक्क्य़ांसह उंचावला. तसेच बँक, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक कंपन्या हे निर्देशांकही तेजी नोंदविणारे ठरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्येही सेन्सेक्सप्रमाणेच जवळपास एक टक्क्य़ापर्यंतची वाढ झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा