रिझव्‍‌र्ह बँकेच्या ज्या स्थिर व्याजदराच्या आशेवर गेल्या सहा व्यवहारांमध्ये निर्देशांकाचा उच्चांकी स्तर कायम राखला, त्या भांडवली बाजाराने याबाबतच्या थेट निर्णयाचे स्वागत आणखी एक उच्चांकी अंशभर टाकत केले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘जैसे थे’ पतधोरणावर व्यवहारात स्थिर प्रतिक्रिया देणाऱ्या मुंबई निर्देशांकाने मंगळवारी ६०.१७ अंश वाढ नोंदवीत सेन्सेक्सला २२,४४६.४४ या सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवले. नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवसातील व्यवहारात त्याने २२,५०० नजीक, २२,४८५.७७ पर्यंत जाणे पसंत केले. सत्रादरम्यानच ६,७३२.२५ पर्यंत मजल मारणारा निफ्टीदेखील सत्रअखेर १६.८५ अंश वाढीसह ६,७२१.०५ या नव्या स्तरावर विराजमान झाला.
सलग सातव्या व्यवहारात उच्चांकी झेप नोंदविणाऱ्या सेन्सेक्सची मंगळवारची सुरुवातच २२,४५५.२३ या नव्या टप्प्यावर झाली. रिझव्‍‌र्ह बँकेचे सकाळी ११ वाजता पतधोरण जाहीर होण्यापूर्वी काहीसा नरम होता. व्याजदर स्थिर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही बाजारात विशेष उत्साह नव्हता. या दरम्यान ९० अंशांची घसरणही राखली गेली. मात्र दुपारच्या सत्रात बाजारात गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केली. परिणामी सेन्सेक्स २२,४८५.७७ या व्यवहारातील वरच्या टप्प्यावर पोहोचला. दिवसअखेर २२,४४६.४४ वर      स्थिरावणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सोमवारच्या तुलनेत ६०.१७ अंश भर घालत उच्चांकातही नवी भर घातली.
दिवसातील नरम व्यवहारातून बाहेर काढण्यास माहिती तंत्रज्ञान, तेल कंपन्यांच्या समभागांचा हातभार लागला. एवढेच नव्हे तर त्यांनी सेन्सेक्सला दिवसाच्या तळातून नव्या ऐतिहासिक टप्प्यांपर्यंतही नेले. सेन्सेक्समध्येही विप्रोचीची कामगिरी उत्तम राहिली.
टीसीएस, रिलायन्सनेही त्याला साथ दिली. प्रमुख निर्देशांकातील निम्मे समभाग वधारले. तर व्याजदराशी निगडित बँक, वाहन, गृहनिर्माण कंपन्यांच्या समभागांवर दिवसअखेरही दबाव कायम राहिला. एकूण बँक क्षेत्रीय निर्देशांक १.८ तर बांधकाम निर्देशांक ०.८ टक्क्यांनी रोडावला.

Story img Loader