निफ्टीच्या किंचित माघारीने सप्ताहाला निरोप

भांडवली बाजारात सप्ताहअखेर संमिश्र व्यवहार नोंदविले गेले. निरंतर नवीन उच्चांकाकडे घोडदौड करणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी काहीशी उसंत घेत शुक्रवारी किरकोळ हालचाल दाखविली.

दिवसअखेर सेन्सेक्समध्ये १०.०९ अंशांची वाढ झाली आणि तो  ३३,१५७.२२ वर स्थिरावताना दिसला. सलग तिसऱ्या व्यवहारात उच्चांक स्थापण्याचा त्याचा हा विक्रम आहे. तर निफ्टीत तुलनेत २०.७५ अंश घसरण झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा निर्देशांक १०,३२३.०५ वर स्थिरावताना त्याच्या ऐतिहासिक टप्प्यापासून ढळलेला दिसून आला.

कंपन्यांचे चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निष्कर्ष, सरकारकडून बँका-पायाभूत क्षेत्राला मिळालेले आर्थिक साहाय्य, डॉलरच्या तुलनेतील भक्कम रुपया यामुळे चालू सप्ताहात भांडवली बाजाराचे निर्देशांक तेजीकडे मार्गक्रमण करत होते. असे असताना सेन्सेक्स तसेच निफ्टी गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात सर्वोच्च टप्पा गाठला होता. गुरुवारी भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होते. तर शुक्रवारी सप्ताहअखेरचे सत्र बाजारात पार पडले.

अशा स्थितीत सेन्सेक्सने शुक्रवारच्या सत्रात ३३,३१५ पर्यंत मजल मारली. तर निफ्टीचा १०,३८३ हा व्यवहाराच्या सुरुवातीला सर्वोच्च स्तर होता.

सप्ताह तुलनेतही सेन्सेक्सची २७ जानेवारीनंतरची उल्लेखनीय कामगिरी नोंदली गेली. चालू आठवडय़ात मुंबई निर्देशांक ७६७.२६ अंशांनी वाढला आहे. ही वाढ २.३७ टक्के आहे. तर यादरम्यान १७६.५० अंश वाढीसह निफ्टी त्याच्या गेल्या आठवडय़ानंतर सर्वोत्तम सप्ताह कामगिरी नोंदविणारा ठरला आहे.

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स सर्वाधिक ४.३१ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर सन फार्मा, ओएनजीसी, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज्, सिप्ला, कोटक बँक, टीसीएस, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आदी ३.६५ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा, पायाभूत क्षेत्र, वाहन आदी तेजीच्या यादीत राहिले. आरोग्यनिगा सर्वाधिक, १.६१ टक्क्याने वाढला. तर दूरसंचार, ऊर्जा, सार्वजनिक उपक्रम, तेल व वायू, बँक, स्थावर मालमत्ता, पोलाद आदी तब्बल ५ टक्क्यांपर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारात मिड कॅप ०.२८ टक्क्याने वाढला. तर स्मॉल कॅपमध्ये ०.२७ टक्के भर पडली. आशियाइ बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहअखेरच्या व्यवहारात तेजी होती. तर युरोपीय बाजारांची सुरुवातही निर्देशांक वाढीसह झाली.

Story img Loader