कालच्या व्यवहारात रुपयातील तळात जाणे फारसे मनावर न घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी होणारे स्थानिक चलनाचे अवमूल्यन गंभीरतेने घेत सेन्सेक्सला १९ हजारावर आणून ठेवले. एकाच व्यवहारात २९८.०७ अंश आपटी घेत मुंबई निर्देशांक १९,१४३.०० या गेल्या दोन महिन्याच्या पातळीवर येऊन ठेपला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास शतकी घसरणीने ५,८०० या अनोख्या टप्प्याच्या आत विसावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग नुकसानीच्या यादीत नोंदले गेले.
रुपया आज दुसऱ्या सत्रात व्यवहारात ५८.९८ पर्यंत घरंगळला होता. याचवेळी रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यातील मोठी घसरण काहीशी थोपविली गेली. मात्र चलनाला त्याचा नवा नीचांक नोंदविण्यास रोखू शकली नाही.
देशातील प्रमुख भांडवली बाजारानेही डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक अवमूल्यन होणाऱ्या रुपयाची दखल नोंदवित सेन्सेक्सला १९ हजारापर्यंत, त्याच्या २२ एप्रिलच्या टप्प्यापर्यंत आणून ठेवले. विशेषत: व्याजदराशी संबंधित बँक समभागांचे मूल्य मंगळवारी चांगलेच जमिनीवर आलेले दिसले. रुपयातील कमकुवतपणा रिझव्‍‌र्ह बँकेला येत्या आठवडय़ात व्याजदर कपात करण्यास रोखू शकतो या अंदाजाने नाराज गुंतवणूकदारांनी बँक समभागांची जोरदार विक्री केली. त्यातच देशातील आघाडीच्या तीन खासगी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेने एकत्रित १०.५ कोटी रुपयांचा केलेला दंडही बँकांचे समभाग खालच्या पातळीवर येण्यास कारणीभूत ठरले.

केवायसी नियमांचे पालन न केल्याबद्दल दंडाला सामोरे जात असलेल्या आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक व अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागांचे मूल्य ३.७५ ते २.६५ टक्क्यांपर्यंत घसरले होते.
बँकांबरोबरच ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद क्षेत्रीय निर्देशांकातील अनेक समभागही आपटले होते. कोळसा घोटाळ्यात जिंदाल स्टीलचे नवीन जिंदाल यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईने पावले उचलल्याने कंपनीचा समभाग दिवसाच्या सर्वाधिक नुकसानीचा बळी ठरला. कंपनीचा समभाग १५ टक्क्यांनी घसरला. एकूण पोलाद निर्देशांक ४.१३ टक्क्यांनी घसरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा