देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे स्वागत प्रमुख निर्देशांकांनीही केले. व्यवहारात २५ हजारांवर झेपावलेला सेन्सेक्स दिवसअखेर किरकोळ वधारणेसह बंद झाला. तर सत्रात ७,५०० पर्यंत मजल मारणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र नाममात्र घसरणीसह स्थिरावला.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात दुपारपूर्वीच २५,१७५.२२ पर्यंत जाताना सेन्सेक्सने दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत किरकोळ २३.५३ अंश वाढ राखूनही बंदवेळी ऐतिहासिक टप्पा कायम राखला. २४,७१६.८८ वर तो बंद झाला, तर व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५०४ पर्यंत झेपावल्यानंतर ८.०५ अंश घसरणीसह ७,३५९.०५ वर आला.
सायंकाळी शपथविधी होत असताना भांडवली बाजाराची सुरुवात व स्थिरता तेजीसह होत होती. मात्र दुपारनंतर मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य खाते व संबंधित मंत्री यांच्या नावाकडे बाजाराने दुर्लक्ष केले. याच वेळी गुंतवणूकदारांनी नफेखोरीही साधली.
सलग दुसऱ्यांदा २५ हजारांचा आकडा पार करणारा सेन्सेक्स व्यवहारात तब्बल ७४१ अंशांनी उडाला, तर गेल्या तीन व्यवहारांतील त्याची वाढ ४१८ अंश राहिली आहे. निफ्टीचीही सत्रातील उडी १३६ अंशांची राहिली. सेन्सेक्सचा यापूर्वीचा व्यवहारातील सर्वोच्च स्तर १६ मे रोजी २५,३७५.६३ तर बंदचा टप्पा २३ मे रोजी २४,६९३.३५ राहिला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही यापूर्वी १६ मे रोजीच व्यवहारातील ७,५६३.५० ही सर्वोच्च झेप नोंदविली आहे, तर त्याचा बंदचा सर्वात मोठा टप्पा २३ मे रोजी ७,३६७.१० इतका होता. निफ्टीला सोमवारी व्यवहारातील तसेच बंदनंतरचा यापूर्वीचा टप्पाही गाठता आला नाही.
सोमवारी सेन्सेक्सच्या दफ्तरी बांधकाम, सार्वजनिक बँक, ऊर्जा या क्षेत्रीय निर्देशांकाना भाव आला. तर समभागांमध्ये महिंद्र अॅण्ड महिंद्र टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, टीसीएस यांचे मूल्य उंचावले. सेन्सेक्समधील १८ समभाग वधारले. वाहन निर्देशांकांची १.४७ टक्क्यांसह चढती कमान राहिली.
पंतप्रधानपदापर्यंत प्रवासात निर्देशांकांची २०% वाढीची साथ
चार राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव सप्टेंबर २०१३मध्ये जाहीर झाल्यानंतर भांडवली बाजारात ऊर्जा निर्माण झाली. तेव्हापासून मोदी प्रत्यक्षात पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंत दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी २० टक्के झेप घेतली आहे. भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकार बहुमताच्या अल्याड-पल्याड असताना दरम्यान सेन्सेक्स हजार अंशांनी माघारीही फिरला. निकालाच्या दिवशी आघाडीला निर्विवाद बहुमत प्राप्त झालेले पाहताच सेन्सेक्सनेही २५ हजारांचा पल्ला गाठत अनोख्या विक्रमासह स्वागत केले. निफ्टीही ७,५००च्या पुढे ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला होता. १६ मेनंतर आजपावेतो सेन्सेक्स २ टक्क्यांनी वधारला. बाजारांच्या यापूर्वीच्या उच्चांकानंतर स्मॉल आणि मिड कॅपही आता अनुक्रमे १५ व १२ टक्क्यांनी उंचावला आहे. आठवडय़ापूर्वीच्या २५ हजारांचे शिखर पादाक्रांत करण्याची पुनरावृत्ती सोमवारी घडली असतानाच बाजार विश्लेषकांनी मुख्य निर्देशांकांच्या झेपेची उंचीही आता वाढविली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सेन्सेक्स डिसेंबर २०१४ अखेपर्यंत ३०,००० पर्यंत तर निफ्टी ८,००० पर्यंत जाईल. यापूर्वी हा अंदाज अनुक्रमे २८,००० व ७,५०० होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा