सेन्सेक्समध्ये भर; निफ्टी ७,५०० कायम
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतातील शून्याखाली राहिलेला घाऊक महागाईचा दर यावर नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सोमवारी गेल्या सहा आठवडय़ातील वरच्या टप्प्यावर झेप घेतली. ८६.२९ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,८०४.२८ वर पोहोचला. मुंबई निर्देशांकाची यापूर्वीची २४,८२४.८३ ही पातळी १ फेब्रुवारी रोजी होती. तर २८.५५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५३८.७५ वर स्थिरावला. त्याचा सप्ताहारंभी सत्रातील तळाचा प्रवास ७,५१५.०५ राहिला.
भांडवली बाजाराची गेल्या सप्ताहाची अखेर जानेवारीतील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराच्या प्रवासावर नोंदविली गेली होती. सोमवारी मात्र आशियाई बाजारातील तेजीच्या जोरावर येथे व्यवहाराला सकारात्मक सुरुवात झाली.
फेब्रुवारीतील घाऊक महागाई दर सलग १६ व्या महिन्यात उणे स्थितीत राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ०.९१ टक्के अशी त्याची नोंद राहिली. दरम्यान, भांडवली बाजारातील सोमवारचे व्यवहार संपूष्टात आल्यानंतर जाहीर झालेला गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दरदेखील ५.१८ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.
सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, भेल, ओएनजीसी, गेल, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, डॉ. रेड्डीज, सिप्ला, मारुती सुझुकी, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मूल्य उंचावले. सेन्सेक्समधील १९ समभाग वाढीच्या यादीत होते.
मुंबई शेअर बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक क्षेत्राने सर्वाधिक मात्र एक टक्क्य़ाखालील वाढ नोंदविली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक ०.४१ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
घसरत्या औद्योगिक उत्पादन व स्थिरावलेल्या महागाई दरामुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा अधिक वृद्धींगत झाली आहे.

‘आयसीडी’ची भारतात व्याजरहित बँक व्यवसाय मनिषा
मुंबई : भारत दौऱ्यावर असलेल्या इस्लामिक कॉर्पोरेशन फॉर डेव्हलपमेंट बँक ऑफ प्रायव्हेट सेक्टर (आयसीडी) या इस्लामिक डेव्हलपमेंट बँक (आयडीबी) समूहाच्या खासगी क्षेत्र विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महामहीम खालिद मोहम्मद अल-आबुदी यांनी देशात व्याजरहित बँकिंग व्यवस्था सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
समूहाचा भारतात विस्तार व्हावा आणि येथील उपक्रमांना चालना मिळावी यासाठी जेदाहस्थित आयडीबी ग्रुप हा बहुउद्देशीय विकास बँक समूह प्रयत्नशील असल्याचे त्यांनी मुंबईत सोमवारी सांगितले. वित्त समूहाचे अधिकृत भांडवल १५० अब्ज डॉलर आहे.
भारतातून येणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी राहण्याची व्यवस्था होण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, हज येथील परंपरांबाबत यात्रेकरूंचे प्रबोधन आणि आयडीबी ग्रुपच्या वतीने ग्रामीण भारतातील लोकांसाठी मेडिकल मोबाईल युनिट स्थापन करणे यांबाबतच्या शक्यता तपासण्यासाठी खासकरून होत आहे.
आयसीडीने स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी १ अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.

Story img Loader