सेन्सेक्समध्ये भर; निफ्टी ७,५०० कायम
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतातील शून्याखाली राहिलेला घाऊक महागाईचा दर यावर नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सोमवारी गेल्या सहा आठवडय़ातील वरच्या टप्प्यावर झेप घेतली. ८६.२९ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,८०४.२८ वर पोहोचला. मुंबई निर्देशांकाची यापूर्वीची २४,८२४.८३ ही पातळी १ फेब्रुवारी रोजी होती. तर २८.५५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५३८.७५ वर स्थिरावला. त्याचा सप्ताहारंभी सत्रातील तळाचा प्रवास ७,५१५.०५ राहिला.
भांडवली बाजाराची गेल्या सप्ताहाची अखेर जानेवारीतील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराच्या प्रवासावर नोंदविली गेली होती. सोमवारी मात्र आशियाई बाजारातील तेजीच्या जोरावर येथे व्यवहाराला सकारात्मक सुरुवात झाली.
फेब्रुवारीतील घाऊक महागाई दर सलग १६ व्या महिन्यात उणे स्थितीत राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ०.९१ टक्के अशी त्याची नोंद राहिली. दरम्यान, भांडवली बाजारातील सोमवारचे व्यवहार संपूष्टात आल्यानंतर जाहीर झालेला गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दरदेखील ५.१८ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.
सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, भेल, ओएनजीसी, गेल, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, डॉ. रेड्डीज, सिप्ला, मारुती सुझुकी, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मूल्य उंचावले. सेन्सेक्समधील १९ समभाग वाढीच्या यादीत होते.
मुंबई शेअर बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक क्षेत्राने सर्वाधिक मात्र एक टक्क्य़ाखालील वाढ नोंदविली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक ०.४१ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
घसरत्या औद्योगिक उत्पादन व स्थिरावलेल्या महागाई दरामुळे रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा अधिक वृद्धींगत झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा