मुंबई : जागतिक मंदीचा धसका घेतल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी जगभरातील भांडवली बाजारांचा मंदीवाल्यांनी ताबा घेतल्याने, स्थानिक बाजारातील प्रमुख निर्देशांकात शुक्रवारी दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली. भांडवली बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा काढता पाय घेतल्याने सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये हजाराहून अधिक अंशांची घसरण झाली.

जागतिक प्रतिकूलता आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ टक्क्यांपर्यंत सीमित राहण्याचा ‘फिच’चा सुधारित अंदाज यामुळे नफावसुलीला जोर चढला. परिणामी शुक्रवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्स १,०९३.२२ अंशांनी म्हणजेच १.८२ टक्क्यांनी घसरून ५८,८४०.७९ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने १,२४६.८२ अंश गमावत ५८,६८७.१७ अंशांचा तळ गाठला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीमध्ये ३४६.५५ म्हणजेच १.९४ टक्क्यांची घसरण झाली आणि तो १७,५३०.८५ पातळीवर स्थिरावला.

अमेरिकेत मासिक आधारावर महागाई वाढल्याने तेथील मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हकडून आक्रमक व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नफावसुलीला प्राधान्य दिल्याने अमेरिकी बाजारांसह जगभरातील बाजारांमध्ये पडझड झाली. देशांतर्गत आघाडीवर माहिती-तंत्रज्ञान, बांधकाम आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक विक्री झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. 

सेन्सेक्समध्ये टेक मिहद्र व अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात प्रत्येकी ४ टक्क्यां टक्क्यांची  घसरण झाली. त्यापाठोपाठ इन्फोसिस, मिहद्र अँड मिहद्र, विप्रो, टीसीएस, नेस्ले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग नकारात्मक पातळीवर व्यवहार करत स्थिरावले.

एकमेव इंडसइंड बँकेचा समभाग तेजीसह व्यवहार करत होता. परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कायम असून गुरुवारच्या सत्रात त्यांनी १,२७०.६८ रुपये मूल्याचे समभाग विक्री केले.

आठवडय़ात ९५२ अंशांचे नुकसान

सरलेल्या आठवडय़ात सेन्सेक्समध्ये १.५९ टक्क्यांची घसरण झाली असून त्याने ९५२.३५ अंश गमावले. तर दुसरीकडे निफ्टीने सरलेल्या सप्ताहात १.६९ टक्क्यांची घसरण अनुभवत ३०२.५० अंश गमावले आहेत.

Story img Loader