मुंबई निर्देशांकाने नोंदविलेली गेल्या सलग तीन दिवसात केलेली ६५२.२२ अंशांची कमाई मंगळवारी एकाच घसरणीत धुवून निघाली. चलन व्यवहारातच रुपयाने सकाळच्या सत्रातच ६५चा नवा नीचांक पार केल्यानंतर सेन्सेक्समधील घसरणीला धरबंद राहिला नाही आणि दिवसभरात हे सत्र कायम राहत अखेर ५९०.०५ अंश घसरणीने सेन्सेक्स हा मुख्य निर्देशांक १७,९२१.८२ पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १८९.०५ अंश घसरणीसह ५,२८७.४५वर दिवसअखेर येऊन ठेपला.
चालू खात्यातील तूट विस्तारण्यास कारणीभूत ठरेल, असे मानले जाणारे अन्नसुरक्षा विधेयक सोमवारी उशिरा संसदेत मंजूर झाले. त्याचे परिणाम मंगळवारी व्यवहार सुरू होताच दिसू लागले. सकाळच्या सत्रात २२१ अंशांच्या नुकसानाने सुरुवात करणारा सेन्सेक्स या वेळी १८३३६ वर आला. त्यातच याचदरम्यान रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६५ चाही स्तर सोडल्याने सार्वजनिक कंपन्या, बँक, बांधकाम, तेल व वायू क्षेत्रातील कंपन्या यांच्या समभागांची जोरदार विक्री सुरू झाली. सेन्सेक्स या वेळी कालच्या १८,५०० वरील टप्प्यापासून माघारी फिरला होता; तर निफ्टीनेही याच दरम्यान ८१ अंशांच्या घसरणीसह ५,४००चा स्तर सोडला. दुपापर्यंत निफ्टीची घसरण याच प्रमाणात राहिली असली तरी सेन्सेक्स मात्र २५० अंशांच्या पुढे घसरत होता. दुपारच्या वेळी तर सेन्सेक्समधील घसरण आणखी विस्तारत जाऊन ती ५२५ अंशांची झाली. याच वेळी मुंबई निर्देशांक १८ हजाराच्या काठावर होता. तर निफ्टीमध्ये या वेळी १६५पर्यंत घसरण झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ५,३००पर्यंत खाली आला.
एव्हाना भारतीय चलन ६६च्याही खाली गेले होते. अखेर सेन्सेक्सनेही जवळपास ६००अंशांची आपटी घेत निर्देशांकाला १८ हजाराच्या खाली आणून ठेवले. तर निफ्टीही जवळपास २०० अंशांच्या घसरणीने ५,३००च्या आत आला. मुंबई शेअर बाजारातील १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली. तर सेन्सेक्समधील ३०पैकी केवळ तीनच समभागांचे मूल्य वधारले. बाजारात कालच्या तुलनेत आज उलाढाल अधिक नोंदली गेली असली तरी गुंतवणूकदारांची १.७ लाख कोटी रुपयांची रक्कम रिती झाली.
कच्चे तेल ११० डॉलरच्या पुढे
अन्नसुरक्षा विधेयकाचा भार चालू खात्यातील तूट वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो या रुपयाच्या घसरणीतील भीतीला आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलांच्या दरांचीही साथ मिळाली. प्रति पिंप १११ डॉलपर्यंत जाणारे इंधनाचे दर हे आता गेल्या पाच महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. सीरियातील अस्वस्थ वातावरणामुळे कच्चे तेल काही दिवसांतच १०० डॉलर प्रति पिंपवरून एकदम ११० डॉलर प्रति पिंपच्या पुढे गेले आहेत.
सोने-चांदीलाही विक्रमी झळाळी
भांडवली बाजार, परकीय चलन व्यवहारात स्थानिकांची जोरदार आपटी सुरू असतानाच काळ्या सोन्याप्रमाणे पिवळे सोनेही मंगळवारी चांगलेच लकाकून गेले. सोन्याचा दर आता तोळ्यासाठी ३२,५००च्याही पुढे गेला आहे. सोने एकाच दिवसात १० ग्रॅममागे ८२० रुपयांनी वधारताना ३२ हजार ५८५ रुपयांपर्यंत गेले आहे. तर चांदीच्या दरातही आज किलोमागे तब्बल २ हजार रुपयांची (१,९४०) वाढ होऊन ते ५६,६७० रुपये झाले आहेत.
बाजाराला भोवळ!
मुंबई निर्देशांकाने नोंदविलेली गेल्या सलग तीन दिवसात केलेली ६५२.२२ अंशांची कमाई मंगळवारी एकाच घसरणीत धुवून निघाली.
First published on: 28-08-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex crashes 590 points on heavy fii selling