तीन दिवसांवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाबाबत व्यावहारिक अपेक्षा बाळगत गेल्या काही दिवसांपासून तेजीसह सज्ज झालेल्या सेन्सेक्सने सोमवारी सप्ताहारंभीच २६ हजारांच्या जादुई आकडय़ाला गाठले. तर निफ्टीने ७,८०० वेशीपर्यंत चाल करणारा सर्वोच्च स्तर गाठला. व्यवहारात २५,१२३.५५ पर्यंत झेप घेणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर १३८.०२ अंश वाढीसह २६ हजारांपल्याड २६,१००.०८ वर थांबला. तर निफ्टी सत्रअखेर ३५.५५ अंशांनी वाढून ७,७८७.१५ वर स्थिरावला.
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर होत आहे. विकासाला चालना देण्याबरोबरच महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविणे अभिप्रेत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या या अर्थसंकल्पासाठी भांडवली बाजार गेल्या अनेक दिवसांपासूनच उत्साहित आहे. असे करताना सेन्सेक्स शुक्रवारअखेर २६ हजारांनजीक पोहोचला होता.
सोमवारी मात्र बाजाराची तेजीसह सुरुवात करताना सेन्सेक्स पहिल्या ४० मिनिटांतच २६ हजारांवर धडकला. या वेळी तो २६,११५ वर होता. यानंतर बाजारात विक्रीचा काहीसा दबाव निर्माण झाल्याने निर्देशांक दुपारच्या व्यवहारात पुन्हा २६ हजारांच्या खाली, २५,९९३ पर्यंत घसरला. मात्र अखेरच्या क्षणी त्याने पुन्हा २६ हजारांवरील झेप घेतली. २६,११९ पर्यंत तो गेला. सत्रातील त्याचा हा उच्चांक होता. तर बंदअखेरही त्याने सर्वोच्च टप्प्याचीच नोंद केली.
बाजाराला कंपन्यांच्या तिमाही नफ्याच्या आशादायक वाढीचीही जोड मिळाली. चालू आठवडय़ात केंद्रीय अर्थसंकल्प येत असतानाच चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही सुरू होत आहेत. याची सुरुवात अर्थातच माहिती तंत्रज्ञानातील इन्फोसिसने होईल.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी शुक्रवारी ७,७५८ वर होता. सोमवारी त्यानेही सत्रात ७,७९२ पर्यंत झेप नोंदविल्यानंतर दिवसअखेर ७,७८७.१५ हा सर्वोच्च टप्पा पार केला. दोन्ही प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर विराजमान झाले आहेत.
मुंबई शेअर बाजारात २.६३ अंश वाढीसह माहिती तंत्रज्ञान निर्देशांकच आघाडीवर राहिला. इन्फोसिस, टीसीएस, विप्रोचे समभाग ३.२३ टक्क्यांसह उंचावले. १.१२ टक्के वाढीच्या ऊर्जा क्षेत्राचीही बाजारात भर पडली. मंगळवारी जाहीर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर या क्षेत्राशी निगडित कंपनी समभागांनीही जोरदार हालचाल सप्ताहारंभी नोंदविली. सेन्सेक्समधील २१ समभाग वधारले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा