नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारी तेजी नोंदली गेली. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये भर घालताना मुंबई शेअर बाजार २६,५०० च्या पुढे गेला. तर ३१ अंश वाढीने निफ्टीने ८,००० पुढील चाल नोंदविली.
मुंबई शेअर बाजारात वाहन तसेच आरोग्यनिगा समभागांना अधिक मागणी राहिली. शुक्रवारी उशिरा जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन दरातील वाढीच्या जोरावर गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात खरेदीचे सत्र आरंभले. बाजार व्यवहारानंतर जाहीर झालेल्या उणे स्थितीतील घाऊक महागाईचे कोणतेही परिणाम बाजारावर उमटू शकले नाही. मान्सूनबाबतचा वेधशाळेचा अंदाज बदलल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
व्यवहारात २६,३०७.८४ पर्यंत खाली गेलेला मुंबई निर्देशांक सत्रात २६,५०० च्या पुढे, २६,७२८.६० पर्यंत झेपावला. गेल्या व्यवहारता ५४.३२ अंशांची वाढ नोंदविणारा सेन्सेक्स सोमवारी १६१.२५ अंश वाढीने २६,५८५.५५ पर्यंत पोहोचला आहे.
३१ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,०१३.९० पर्यंत गेला आहे. सत्रात ७,९४४.८५ असा तळ राखल्यानंतर त्याने ८,०५७.७० पर्यंत मजल मारली.
एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादन दर ४.१ टक्के असा गेल्या दोन महिन्याच्या वरच्या टप्प्यावर नोंदला गेला आहे. तर घाऊक महागाई दरही मेमध्ये सलग सातव्या महिन्यात शून्याखाली आला आहे.
मान्सूनचा अंदाज व दक्षिणेतील अनेक भागात त्याचे प्रत्यक्षात रुजू होणे बाजारात तेजी आणण्यास कारणीभूत ठरल्याचे मत हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी व्यक्त केले. आशियाई तसेच युरोपीयन बाजारात अद्यापही निराशेचे वातावरण कायम असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. युरोपातील ग्रीसच्या अर्थस्थितीची चिंता अद्याप असल्याचेही ते म्हणाले.
सेन्सेक्समध्ये ३० पैकी १७ समभागांचे मूल्य उंचावले. त्यातही सन फार्मा, महिंद्र अॅन्ड महिंद्र, बजाज ऑटो, एचडीएफसी, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हिंदाल्को, वेदांता यांचा वरचा क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक, ११२ टक्क्य़ांसह तर पाठोपाठ आरोग्यनिगा निर्देशांक ०.९६ टक्क्य़ांसह वाढले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा