पंधरवडय़ात सेन्सेक्सने पुन्हा एकदा २६ हजारांचा टप्पा पार केला आहे. सलग सहाव्या सत्रात वधारणारा मुंबई निर्देशांक मंगळवारी ३१०.६३ अंश वधारणेने २६,०२५.८० वर पोहोचला. ८३.६५ अंश वधारणेने निफ्टी ७,७६७.८५ पर्यंत गेला. दोन्ही प्रमुख निर्देशांकात एक टक्क्याहून अधिक भर नोंदली गेली. भारतातील आघाडीच्या कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांला विदेशी संस्थागत गुंतवणूकदारही पसंती देत असल्याचे बाजारात चित्र आहे.
सहाही सत्रातील मुंबई निर्देशांकाची भर एक हजारांहून अधिक, १,०१८ अंशांची राहिली आहे. सोमवारीही नव्या सत्राची सुरुवात करताना सेन्सेक्स ७३ अंश वधारणेमुळे गेल्या पंधरवडय़ातील उच्चांवर पोहोचला होता. मंगळवारच्या जवळपास सव्वा टक्क्याच्या निर्देशांक वाढीने मुंबई शेअर बाजाराची जुलैमधील आतापर्यंतची वाढ २.३ टक्क्यांची राहिली आहे. सेन्सेक्सने ७ जुलै रोजी २६,१०० पर्यंत मजल मारली होती.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या वित्तीय निकालांचा हंगाम इन्फोसिसच्या नफ्यातील वाढीने दहा दिवसांपूर्वी सुरू झाला. पाठोपाठ टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयडिया सेल्युलर यांचेही वाढत्या फायद्यातील निष्कर्ष जाहीर होत आहे. अर्थातच त्याला विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी अधिक मोठा प्रतिसाद दिला. स्थिरावत असलेले आंतरराष्ट्रीय भांडवली बाजार आणि पूर्वपदावर येत असलेला मान्सून यालाही बाजार प्रतिसाद देत आहे.
नफेखोरीमुळे मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक स्थिर राहिले. तर तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक २.०२ टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्समधील तब्बल २५ कंपनी समभाग तेजीच्या यादीत राहिले. सेन्सेक्सचा सत्रातील उच्चांक ८ जुलै रोजीचा २६,१९०.४४ हा आहे. मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २६,०५०.३८ पर्यंत तर निफ्टी सत्रात ७,७७३.८५ पर्यंत झेपावला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये आतापर्यंत समभागांमध्ये १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
इंडोको रेमिडिजचा वर्षांच्या उच्चांकाला स्पर्श
गोव्यातील औषध निर्मिती प्रकल्पातील दोन यंत्रणांना अमेरिकेच्या अन्न व औषध नियंत्रकाची परवानगी मिळाल्याच्या वृत्तानंतर इंडोको रेमिडिजच्या समभागाने मंगळवारच्या मुंबई शेअर बाजारातील व्यवहारात वर्षभराचा उच्चांक गाठला. समभाग सत्रात १९.९९ टक्क्यांनी उंचावत १९७.४५ या गेल्या ५२ आठवडय़ांच्या सर्वोच्च स्तराला पोहोचला. दिवसअखेर त्याने सोमवारच्या तुलनेत १७.९६ टक्के वाढ राखत १९४.१० रुपयांवर स्थिर राहणे पसंत केले.
अमेरिकन नियंत्रकाद्वारे कंपनीच्या वेर्णा येथील औषध उत्पादन केंद्रांची पाहणी ऑगस्ट २०१३ मध्ये करण्यात आली होती. यामुळे अमेरिकेची मान्यता मिळालेल्या कंपनीच्या केंद्रांची संख्या आता सहा झाली आहे. यामुळे कंपनीला अमेरिकेत व्यवसाय विस्तार करणे सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी दिली आहे.
दूरसंचार समभागांची ‘रेंज’ विस्तारली!
भांडवली बाजाराला उच्चांकासमीप नेऊन ठेवण्याच्या प्रक्रियेत दूरसंचार कंपन्यांचा समभागांचा सिंहाचा वाटा राहिला. ध्वनिलहरींमध्ये भागीदार होण्यास कंपन्यांना दूरसंचार प्राधिकरणाने सोमवारी मंजुरी दिल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मंगळवारी बाजारातील व्यवहारात तब्बल ५ टक्क्यांपर्यंत उंचावले.
सोमवारी उशिरा आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरने नफावाढीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले होते. मंगळवारी ५ टक्के वाढीसह भारती एअरटेल सेन्सेक्समध्येही सरस राहिला. ध्वनिलहरी भागीदारीमुळे दूरसंचार कंपन्यांच्या खर्चात कपात होणार असून याचा लाभ मोबाइल ग्राहकांना मिळणार आहे.
अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर काही दिवसांचा रुसवा दूर सारून शेअर बाजाराने पुन्हा तेजीकडे कूच सुरू केली आहे. विशेषत: इन्फोसिसपाठोपाठ ताज्या निकाल हंगामात टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयडिया सेल्युलर यांच्या आर्थिक कामगिरीने बाजारात चैतन्य आणले आहे.
रुपया महिन्यातील तळातून बाहेर
मुंबई: डॉलरच्या तुलनेत मंगळवारी सहा पैशांनी उंचावलेला रुपया आता गेल्या महिन्याभराच्या नीचांकी तळातूनही बाहेर आला आहे.
अमेरिकन चलनासमोर रुपया आता ६०.२४ वर पोहोचला आहे. नव्या व्यवहाराची सुरुवात करताना रुपया ६०.२५ या उच्चांकावर होता. व्यवहारात तो ६०.२८ पर्यंत घसरलाही. मात्र सत्रातील त्याचा उच्चांक ६०.१८ राहिला. रुपया सोमवारी ६०.३० वर स्थिरावला होता, तर यापूर्वीच्या सहा सत्रात तो ३७ पैशांनी घसरला होता.
सोने २८ हजारांखाली
मुंबई : सोन्याचा भाव मंगळवारी तोळ्यासाठी थेट २२५ रुपयांनी कमी झाल्याने स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमचा भाव आता २८ हजार रुपयांखाली उतरला आहे. मौल्यवान धातू २७,९६० रुपयांवर स्थिरावले. शुद्ध सोन्याचा दरही २२५ रुपयांनी कमी होत १० ग्रॅमसाठी २८,११० रुपयांवर आले आहे. चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी मोठी घसरण अनुभवली गेली. पांढऱ्या धातूचा किलोचा भाव ३३५ रुपयांनी कमी होत ४५,५३५ रुपयांवर आला.