सलग तीन सत्रातील घसरणीसह गुरुवारच्या व्यवहारात द्विशतकी निर्देशांक वाढ नोंदविणारा मुंबई शेअर बाजार पुन्हा घसरणीच्या प्रवासाला निघाला. आघाडीच्या खाजगी बँकांमध्ये काळा पैसा असल्याच्या वृत्ताने एकूणच बँक क्षेत्रातील समभागांचा भांडवली बाजारावर दबाव निर्माण होऊन ‘सेन्सेक्स’ने १४३ अंशांची गटांगळी घेत १९,५०० च्या खालच्या स्तरावर राहणे पंसत केले.
व्याजदर कपातीच्या आशेने प्रसंगी फेब्रुवारीमध्ये वाढलेल्या महागाई दराकडे दुर्लक्ष करत मुंबई निर्देशांकाने कालच्या सत्रात २०८ अंशांची वाढ नोंदविली होती. तर ‘निफ्टी’देखील अर्धशतकी वाढीसह ५,९०० या टप्प्यावर पोहोचला होता. तत्पूर्वी गेल्या तीनही सत्रातील घसरण मिळून प्रमुख भांडवली बाजाराने ३२१ अंशांचे नुकसान सोसले आहे. बाजाराने आज पुन्हा तोच कित्ता गिरवला. दिवसाच्या व्यवहारात १९,७०० नजीक जाऊ पाहणाऱ्या मुंबई निर्देशांकाला खाजगी बँकांच्या समभागांच्या विक्रीने खाली आणले. कालपासून चर्चेत असलेल्या आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक यांचे समभाग मूल्य एक ते चार टक्क्यांपर्यंत आपटले होते. ‘सेन्सेक्स’मधील १८ समभागही घसरले. आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते; तर युरोपीय बाजारांची सुरुवात नरमाईने झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा