नव्या संवत्सराचा नियमित पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भांडवली बाजाराने नकारात्मकता नोंदविली. सलग पाच व्यवहारांतील वाढ मोडून काढत सोमवारच्या व्यवहारात २७ हजारानजीक गेलेल्या ‘सेन्सेक्स’ने बाजार बंद होताना जवळपास शतकी घसरण राखली. तर निफ्टीही व्यवहार बंद झाले तेव्हा ८ हजारांखाली स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये शुक्रवारच्या तुलनेत ९८.१५ अंश घसरण होऊन मुंबई निर्देशांक २६,७५२.९० वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२.८५ अंश घसरणीसह ७९९१.७० वर येऊन ठेपला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीला मंगळवारपासून सुरुवात होत आहे, तर महिन्याच्या वायदापूर्तीचे व्यवहार गुरुवारी संपत आहेत.
गुंतवणूकदारांनी मुंबई शेअर बाजारात खरेदी करत शुक्रवारी मुहूर्ताचे सौदे तेजीसह केले होते. संवत्सर २०७०ची २६ टक्के वाढ झाल्यानंतर नव्या संवत्सराचा पहिला दिवस वधारणेसह पार पडला होता. नियमित व्यवहाराच्या पहिल्या दिवशी मात्र फेडरल रिझव्‍‌र्हच्या आगामी पतधोरण बैठकीचे सावट उमटले.
घसरणीने सेन्सेक्स महिन्याच्या उच्चांकापासूनही माघारी फिरला आहे. व्यवहारात २६,९९४.९६ पर्यंत मजल मारणाऱ्या सेन्सेक्सने सत्रअखेर गेल्या सहा व्यवहारांतील पहिली घट नोंदविली. यापूर्वीच्या सलग पाच व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाची तेजी ८५१.७१ अंशांची राहिली आहे. कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरणीच्या अपेक्षेने तेल व वायू कंपन्यांसह स्थावर मालमत्ता, वाहन क्षेत्रातील कंपन्यांचेही समभाग मूल्य रोडावले. तर ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, बँक, ऊर्जा समभाग वधारले.

Story img Loader