ढासळत्या रुपयाने भांडवली बाजारात बुधवारी पुन्हा एकदा गहजब माजविला. दिवसाची सुरुवात तेजीसह करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने मध्यंतरात तब्बल ७०० अंशांची घसरण नोंदवून तमाम अर्थव्यवस्थेला धक्का दिला. व्यवहाराअखेर त्यातील ही घट कमी झाली असली तरी सुरुवातीच्या वधारलेल्या जवळपास ३०० अंशांच्या प्रमाणातच त्याने घसरणीची कामगिरी बजाविली. व्यवहारात ६४.११ असा विक्रमी तळ गाठलेल्या रुपयाला पाहून गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला १७ हजारांखाली खेचत त्याच्या ११ महिन्यांच्या नीचांकाजवळ कायम ठेवले. सलग चौथ्या सत्रातील मोठय़ा घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील शतक अंशांच्या नुकसानासह ५,३०० वर येऊन ठेपला आहे.
३४०.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स १७,९०५.९१ वर तर ९८.९० अंश घटीसह  निफ्टी ५,३०२.५५ वर स्थिरावला आहे. जवळपास दोन टक्क्यांच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांतील नुकसानामुळे बाजारांनी ११ सप्टेंबर २०१२ नंतरचा स्तर अनुभवला आहे.
शुक्रवारपासून सलग सुरू असलेल्या चार दिवसांतील सेन्सेक्समधील घसरण १,४६१.६८ अंश नोंदली गेली आहे. यामुळे या कालावधीत मुंबई निर्देशांक १९,३६७.५९ वरून थेट १७,९०५.९१ वर आला आहे.
मुंबई निर्देशांकाने बुधवारी व्यवहारात ७६०.५१ अंशांची आपटी घेतली. व्यवहाराची सुरुवात ३०० अंशांच्या तेजीने १८,५००च्या पुढे झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी उशिरा जाहीर केलेल्या रुपयाच्या घसरणीला रोखणाऱ्या उपायांमुळे या वेळी भांडवली बाजारात समाधानाचे चित्र होते. मात्र परकी चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६४च्या खालीच असल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात समाविष्ट समभागांची विक्री सुरू ठेवली. व्यवहारात दुपारच्या सत्रातच कालच्या तुलनेत ७०० अंशांची घसरण गाठून सेन्सेक्स १८ हजारांच्याही खाली आला. १८,५६७.७० या दिवसाच्या उच्चांकापासून १७,८०७.१९ पर्यंत तळ गाठल्यानंतर दिवसअखेर काहीशा सावरण्यासह १८ हजारानजीक बाजार पोहोचला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २५ समभागांचे मू्ल्य घसरले. तर पोलाद, तेल व वायू आदी निर्देशांक घसरणीत आघाडीवर होते.
आशियाई बाजारात संमिश्र चित्र राहिले. तर युरोपीय बाजारातील घसरण कायम होती. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत बुधवारी उशिरा जाहीर होत असलेल्या उपाययोजनांवर भांडवली बाजारातील व्यवहाराचे चित्र उमटले.

Story img Loader