भांडवली बाजारातील निर्देशांक वाढ नव्या आठवडय़ाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली. सलग पाचव्या व्यवहारात सेन्सेक्ससह निफ्टीने वाढ राखली आहे. प्रमुख निर्देशांक आता गेल्या पंधरवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचले आहे.
नव्या सप्ताहाची सुरुवात सकाळच्या सत्रात २०० हून अधिक अंशाने वाढ नोंदविणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर मात्र अवघ्या ४०.९५ अंशाने वाढत २९,१३५.८८ वर तर निफ्टी नाममात्र अशा ३.८५ अंश वाढीने ८,८०९.३५ पर्यंत पोहोचला.
महिनाअखेर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणा कायम राहण्याची आशा बाजारातील व्यवहाराद्वारे गुंतवणूकदारांनी सोमवारी पुन्हा व्यक्त केली.
तर घाऊक महागाई दरदेखील कमी होत असल्याने रिझव्र्ह बँकेमार्फत व्याजदर कपातीची अपेक्षाही यावेळी व्यक्त झाली. मात्र त्याचबरोबर युरोपातील ग्रीस देशाच्या अर्थसहाय्याबाबतच्या बैठकीकडे नजर ठेवून येथील बाजारातील व्यवहारांमुळे दबाव निर्माण झाला. त्यामुळेच दिवसअखेर प्रमुख निर्देशांक सुरुवातीची वाढ दिवसअखेर कायम ठेवू शकले नाही. मात्र त्यातील वाढ ही शुक्रवारच्या तुलनेत किरकोळ का होईना अधिकच राहिली.
गेल्या आठवडय़ाअखेरचा २९ हजारापुढील मुंबई निर्देशांकाचा प्रवास सोमवारीही कायम राहिला. सत्रात सेन्सेक्सचा दिवसाच्या प्रारंभीचा २९,३२५.३५ पर्यंत झेपावला. तर मध्यांतरातील विक्रीच्या दबावापोटी मुंबई निर्देशांक २९,०८३.४० पर्यंतही घसरला होता.
वाहन, ऊर्जा क्षेत्रातील कंपनी समभागांना मागणी राहिली. तर सेन्सेक्समधील टीसीएस, भारती एअरटेल, एचडीएफसी, सिप्ला, डॉ. रेड्डीज, गेल, एचडीएफसी बँक, महिंद्र अॅन्ड महिंद्र, एनटीपीसी, ओएनजीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स यांचे मूल्य उंचावले. येथील निम्म्याहून अधिक समभाग वधारले. दर सन फार्मा, हिंदाल्को, अॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्पसारखे काही समभागांचे मूल्य मात्र घसरले.
सोमवारच्या वाढीसह मुंबई निर्देशांकाची गेल्या पाच व्यवहारातील झेप ही ९०८.४९ अंश राहिली आहे. महाशिवरात्रीनिमित्त भांडवली बाजारातील व्यवहार मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी होणार नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा