निफ्टी ८,२०० खाली
गेल्या तीन आठवडय़ांतील पहिली सप्ताह घसरण नोंदविताना प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारी मोठी आपटी नोंदविली. ३३.५५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सप्ताहअखेर ८,२०० चाही स्तर सोडला. तर १२७.७१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,६३५.७५ पर्यंत थांबला.
येत्या काही दिवसातील प्रमुख आंतरराष्ट्रीय घडामोडींची काळजी येथील निर्देशांकांनी शुक्रवारी वाहिली. व्याजदर वाढीबाबत अमेरिकी फेडरल रिझव्र्हची येत्या आठवडय़ात होणारी बैठक व ब्रिटनच्या युरोपियन संघ सदस्याचे २३ जून रोजी ठरणारे भवितव्य या पाश्र्वभूमीवर येथील बाजारात निरुत्साह दिसून आला. परिणामी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे व्यवहार अधिक करीत प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या गेल्या सात महिन्यातील वरच्या टप्प्यापासून आणखी दूर नेले.
गुरुवारी २५७.२० अंश घसरण नोंदविलेल्या मुंबई निर्देशांकाने शुक्रवारी आणखी शतकाहूनही अधिक भर त्यात टाकली. तर निफ्टीला आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी त्याचा ८,२०० हा अनोखा टप्पाही मागे टाकावा लागला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, बँक, भांडवली वस्तू, पोलाद, आरोग्यनिगा आदींमध्ये घसरण झाली. सेन्सेक्समध्ये गेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, कोल इंडिया, स्टेट बँक, मारुती सुझुकी, ओएनजीसी, एशियन पेंट्स, आयटीसी, सिप्लासारख्या २१ समभागांचे मूल्य घसरले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आगामी वित्तीय निष्कर्ष चिंताजनक राहण्याची भीती ‘मूडीज गुंतवणूकदार सेवे’च्या अहवालात व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध या क्षेत्रातील बँक समभागांचे मूल्य १.५ टक्क्य़ांपर्यंत घसरले. सार्वजनिक बँकांना सरकारने अपेक्षित भांडवल विहित मुदतीत न दिल्यास बँकांवरील आर्थिक ताण अधिक राहण्याबाबतही भीती व्यक्त केली गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा