सलग पाचव्या म्हणजे संपूर्ण आठवडा घसरण नोंदविण्याचा क्रम कायम राखत, शुक्रवारी सेन्सेक्स आणखी १८१.३१ अंशाने घसरला. परिणामी सप्ताहअखेर २६,६५६.८३ या महिन्याभराच्या तळात सेन्सेक्स विसावला. तर निफ्टीने नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या पहिल्या दिवशी ८,१००चाही स्तर सोडला. ४५.९५ अंश घसरणीमुळे तो ८,०६५.८० वर स्थिरावला.
मुंबई निर्देशांकांमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या आयटीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांनी चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी न बजाविल्याचे मानून गुंतवणूकदारांनी शुक्रवारी समभाग विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे व्यवहारात २६,९४२.२९ पर्यंत गेलेला सेन्सेक्स सत्रात २६,५८५.२० पर्यंत आला.
सेन्सेक्समधील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, भेल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे समभाग घसरले. तर सत्रातील तेजीमुळे एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज यांचे मूल्य दिवसअखेरही वाढते राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तूला सर्वाधिक २.६५ टक्के फटका बसला. पाचही व्यवहारातील घसरत्या क्रमामुळे सेन्सेक्सने सप्ताहात ८१३.९८ अंश तर निफ्टीने २२९.७० अंश गमावले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे ३.०५ व २.८४ असे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा