चालू आठवडय़ात गुरुवारचा दिवस वगळता इतर सर्व व्यवहारांतील घसरणीचा क्रम भांडवली बाजाराने सप्ताहअखेरही कायम राखला. २०७.८९ अंश घसरणीने सेन्सेक्स २५,०४४.४३ वर पोहोचला. व्यवहारात २५ हजारांचा तळ सोडण्याचा अनुभव घेतल्यानंतरही मुंबई निर्देशांक दिवसअखेर त्याच्या तीन महिन्यांच्या नीचांकावर राहिला.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या महत्त्वाच्या टप्प्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ७,६०० हा स्तर व्यवहारादरम्यान सोडला. सत्रात ७,५७५.३० पर्यंत घसरल्यानंतर निफ्टी दिवसअखेर काहीसा सावरला; मात्र गुरुवारच्या तुलनेत त्यात घसरणच नोंदली गेली. ७२.८५ अंश घसरणीसह निफ्टीने ७,६१०.४५ वर सप्ताहअखेर केली.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील ही गेल्या आठ व्यवहारांतील सातवी घसरण ठरली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ५९३.६८, तर निफ्टी १७१.४५ अंशांनी खाली आला आहे. बाजार आता गेल्या दोन महिन्यांच्या नीचांकात स्थिरावला आहे. सलग दुसरी सप्ताह घसरण यंदा नोंदली गेली आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या आगामी संभाव्य दरवाढीच्या बैठकीबरोबरच येत्या आठवडय़ात येऊ घातलेल्या भारतातील औद्योगिक उत्पादन दर तसेच महागाईच्या आकडय़ावरही भांडवली बाजाराचा आगामी प्रवास अवलंबून असेल.
सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात करताना सेन्सेक्स ६१ अंशांनी घसरला होता. याच वेळी त्याने २५,२०० चा स्तर सोडला. व्यवहारात ही घसरण विस्तारत मुंबई निर्देशांकाला त्याच्या २५ हजारांच्या टप्प्यापासूनही फारकत घेणारी ठरली. दिवसअखेर काही प्रमाणात खरेदी झाल्याने पुन्हा २५ हजारांवरील टप्पा निर्देशांकाला गाठता आला. मात्र गुरुवारच्या तुलनेत त्यात घसरणच राहिली.
वाहनाबरोबरच बँक क्षेत्रातील समभागांचे मूल्य शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात घसरले. बँक निर्देशांक एकूण २.२५ टक्के घसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा