२९ हजार आणि ८,८०० हे अनोखे टप्पे पार करत अनुक्रमे सेन्सेक्स व निफ्टी सोमवारी महिन्याच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाले. सेन्सेक्समधील दीडशेहून अधिक तर निफ्टीतील अर्धशतकी निर्देशांक वाढीने प्रमुख निर्देशांकांनी सलग सातव्या व्यवहारातील तेजी सप्ताहारंभी नोंदविली.
फेब्रुवारीमधील औद्योगिक उत्पादनाचा दर ५ टक्के अशा गेल्या नऊ महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्याचे स्वागत सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारात झाले. नव्या आठवडय़ाची सुरुवात केल्यापासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते.
दिवसातील काहीशा अस्थिर वातावरणाने मुंबई निर्देशांकाने २९ हजाराखालील, २८,८४३.९४ या सत्राचा तळही अनुभवला. वरच्या टप्प्यावर गुंतवणूकदारांची नफेखोरी यावेळी अनुभवली गेली. मात्र दिवसात तो २९ हजाराच्या वर, २९,०७२.५१ पर्यंत झेपावला. दिवसअखेरही त्यातील वाढ ही शुक्रवारच्या तुलनेत अधिकच राहिली.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाची ही ५ मार्चनंतरचा सर्वात वरचा बंद स्तर होता. निफ्टी सोमवारच्या सत्रात ८,८४१.६५ ते ८,८३४ दरम्यान प्रवास करता झाला. दिवसअखेर त्यात ५० हून अधिक अंशांची वाढ झाल्याने त्याचा ८,८०० पारचा स्तरही कायम राहिला.
सेन्सेक्समधील लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोचा समभाग २.३ टक्क्य़ांनी वाढला. कंपनीने फ्रान्सच्या अरेवा कंपनीबरोबर केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठीच्या निर्मिती उपकरण करारानंतर समभागाला भाव मिळाला. कंपनीचा समभाग व्यवहारात २.४१ टक्क्य़ांपर्यंत उंचावला. दिवसअखेर २.३ टक्के वाढीसह एल अ‍ॅन्ड टी १,८०१.९५ वर बंद झाला. महाराष्ट्रातील जैतापूर येथील ९,९०० मेगा व्ॉट अणुऊर्जा प्रकल्पासाठीच्या कंपनीबरोबर फ्रान्सने सहकार्य केले आहे. ३.१८ टक्क्य़ांसह भारती एअरटेल सेन्सेक्सच्या तेजीत वरचढ ठरला. त्याचबरोबर सन फार्मा, भेल, रिलायन्स इंडस्ट्रिज, हिंदुस्थान यूनिलिव्हर, सिप्ला, टाटा पॉवर यांचेही समभाग मूल्य वाढले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप अनुक्रमे ०.८१ व ०.३१ टक्क्य़ांनी वाढले. सेन्सेक्समधील १६ समभाग तेजीच्या यादीत होते.
मुंबई शेअर बाजारातील १२ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी केवळ वाहन व स्थावर मालमत्ता वगळता इतर सर्व १० निर्देशांक तेजीत राहिले. त्यातही ग्राहकपयोगी वस्तू, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल व वायू हे आघाडीवर होते. तर महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, गेल, हिंदाल्को, सिस्टेमा श्याम टेलिकॉम यांच्या समभाग मूल्यात २.५ टक्क्य़ांपर्यंतची घसरण झाली.
भांडवली बाजाराची आगामी हालचाल कंपन्यांकडून जाहिर होणाऱ्या गेल्या आर्थिक वर्षांतील कामगिरीवर अवलंबून असेल. त्याचबरोबर सोमवारी उशिरा जाहिर होणाऱ्या व मंगळवारी स्पष्ट होणाऱ्या अनुक्रमे किरकोळ व घाऊक किंमत निर्देशांकावरही गुंतवणूकदारांचे व्यवहार होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भांडवली बाजार मंगळवारी बंद राहणार आहेत.
रुपया सप्ताहाच्या तळात
मुंबई : डॉलरच्या तुलनेतील रुपयाची घसरण गेल्या काही सत्रांपासून कायम असून सोमवारी त्याने सप्ताहाची गटांगळी खाल्ली. भारतीय चलन २० पैशांनी घसरून सप्ताहारंभी ६२.५१ या तळात विसावले. भांडवली बाजारातील तेजी मुंबई निर्देशांकाला २८ हजार तर निफ्टीला ८,८०० वर घेऊन गेली असली तरी परकी चलन व्यासपीठावर रुपया कमालीचा कमकुवत बनला आहे. सोमवारच्या व्यवहारात रुपया ६२.३३ या कमी स्तरावरून सुरुवात केल्यानंतर सत्रात ६२.५६ पर्यंत घसरला. तर त्याचा वरचा टप्पा अवघा ६२.३२ पर्यंतच पोहोचू शकला. सोमवारची त्याची घसरण ०.३२ टक्क्य़ांची राहिली. दरम्यान, परकी चलन व्यवहारासह मुंबई सराफा बाजारातील व्यवहारही मंगळवारी होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा