गेल्या सलग चार व्यवहारातील घसरणीला मागे सारत भांडवली बाजाराने बुधवारी तेजी नोंदविली. शतकी निर्देशांक वाढीने सेन्सेक्सने २५ हजाराचा टप्पा पुन्हा पार केला. मुंबई निर्देशांकात १०४.२० अंश भर पडल्याने सेन्सेक्स २७,५६३.४३ पर्यंत पोहोचला. तर ३८.०५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३७५.०५ वर, या ८,४०० नजीकच्या टप्प्यानजीक आता आहे.
भांडवली बाजारात गुरुवारी वायदापूर्तीच्या महिन्यातील अखेरच्या दिवसाचे व्यवहार होणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या मंगळवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीचे फलितही त्याचवेळी स्पष्ट होईल. सेन्सेक्सने गेल्या चार व्यवहारात १,०४५.७० अंशांची आपटी नोंदविली आहे. यामुळे मुंबई निर्देशांक २५,५०० च्याही खाली गेला होता.
बुधवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांचे मूल्य वाढले. त्यातही इन्फोसिस २ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. सोबतच मारुती सुझुकी, ल्युपिन, भेल, टाटा स्टील, हिंदाल्को समभाग मूल्यात वाढ नोंदली गेली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहन, बँक, औषध निर्माण, पोलाद वरचढ ठरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकात एक टक्क्य़ापर्यंतची वाढ राखली गेली.
आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकही बुधवारी वाढले. शांघाय कम्पोझिट, हँग सँग तसेच स्ट्रेट टाईम्स ३.४० टक्क्य़ांहून अधिक वाढले. गेल्या तीन व्यवहारातील आंतरराष्ट्रीय निर्देशांकाची वाढ दुहेरी टक्क्य़ातील आहे. फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर भूमिकेवर आंतरराष्ट्रीय बाजारांचा तेजी अथवा घसरणीचा प्रवास अवलंबून असेल, असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader