* सेन्सेक्ससाठी दशकातील तिसऱ्या खराब कामगिरीचे वर्ष
* मोदी सरकारबद्दल आशा ते भ्रमनिरासाचा प्रवास
केंद्रात एकहाती निर्विवाद सत्ता मिळालेल्या मोदी सरकारचे संवत्सर २०७१ प्रारंभी स्वागत करणाऱ्या शेअर बाजाराने याच सरकारकडून निराशा झाल्याची प्रतिक्रिया संवत्सराची अखेर करताना व्यक्त केली आहे. बाजारासाठी हिंदू कालगणनेकरिता महत्त्वाचे गणले जाणाऱ्या या कालावधीत सेन्सेक्सने गेल्या दशकातील तिसरी मोठी निर्देशांक आपटी नोंदविली आहे. मंगळवारी संपलेल्या संवत्सर २०७१ मध्ये सेन्सेक्स ३.८९ टक्क्यांनी तर निफ्टी २.६५ टक्क्यांनी रोडावला आहे.
संवत्सर २०७१ च्या अखेरच्या सत्राची समाप्ती करताना सेन्सेक्स ३७८.१४ अंश घसरणीसह २५,७४३.२६ वर तर १३१.८५ अंश घसरणीसह निफ्टी ७,७८३.३५ पर्यंत घसरला. दोन्ही निर्देशांकाचा हा गेल्या सहा आठवडय़ातील नीचांक राहिला आहे.
यापूर्वीच्या सलग तीन संवत्सरात सेन्सेक्स वधारता राहिला आहे. २०७०, २०६९ व २०६८ मध्ये मुंबई निर्देशांकाने अनुक्रमे २६.४२, १४.०७ व ७.६९ टक्के वाढ राखली आहे. तर यापूर्वीचा मुंबई शेअर बाजाराचा -१७.६९ टक्के हा नकारात्मक प्रवास २०११ मध्ये (संवत्सर २०६७) नोंदला गेला आहे. तत्पूर्वी, २००८ मध्ये (संवत्सर २०६४) मुंबई निर्देशांक तब्बल ५२.३६ टक्क्यांनी आपटला होता. गेल्या दीड दशकांमध्ये सेन्सेक्स २००९ मध्ये (संवत्सर २०६५) वार्षिक तुलनेत सर्वाधिक, ९२.३४ टक्क्यांसह उंचावला होता.
केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाप्रणीत लोकशाही आघाडी सरकारचे आकर्षण बाजाराला संवत्सर २०७१ च्या प्रारंभीही होते. २२ ऑक्टोबर २०१४ रोजी म्हणजेच संवत्सर २०७१ च्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स २६,७८७.२३ तर निफ्टी ७,९९५.९० वर होता. मात्र आर्थिक सुधारणांना येत नसलेला वेग पाहून विशेषत: विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला. त्यातच ऑक्टोबरपासून मोदीरयाही ओसरू लागली. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे निराशाजनक तिमाही वित्तीय निष्कर्ष आणि बिहार विधानसभेतील भाजपाचा दारुण पराभव याची छाया शेअर बाजारात संवत्सर मावळतीलाही कायम राहिली.
संवत्सर २०७१ च्या अखेरच्या, मंगळवारच्या सत्रादरम्यान सेन्सेक्स २५,७०९.२३ पर्यंत घसरला. तर दिवसअखेरही निफ्टी ७,८०० च्या खाली राहिला. गेल्या चार व्यवहारात सेन्सेक्समधील घसरण ४६९.१९ अंश राहिली आहे. परिणामी सेन्सेक्स २६ हजाराच्याही खाली येऊन ठेपला आहे. तर निफ्टीनेही २०१५ मध्ये प्रथमच ८ हजाराचा स्तर सोडला आहे. बाजाराने सलग पाचव्या व्यवहारात घसरण नोंदविली आहे.
मंगळवारी सेन्सेक्समधील २३ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज, रिलायन्स इंडस्ट्रिज, ल्युपिन फार्मा, कोल इंडिया, वेदांता, भेल, सन फार्मा आदींचा समावेश राहिला.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीदारांकडून मिळालेल्या प्रतिसादाने तसेच ऑक्टोबरमधील वाहन विक्रीचे आकडे जाहीर झाल्यानंतर बाजारात वाहननिर्मिती कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून अधिक मागणी राहिली. मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र असे जवळपास साऱ्याच वाहन कंपन्यांचे समभाग १.६८ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवीत होते.
घसरणीत क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू निर्देशांकाला सर्वाधिक, ३.७७ टक्के फटका बसला. तर पोलाद, आरोग्य निगा, स्थावर मालमत्ता हे निर्देशांक घसरणीत आघाडीवर होते.

आज मुहूर्ताचे सौदे
व्यवहाराची वेळ : ५.४५ ते ६.४५
शेअर बाजार लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदानिमित्त अनुक्रमे बुधवार व गुरुवारी बंद राहील. असे असले तरी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तसेच नव्या संवत्सराचे स्वागत म्हणून बुधवारी सायंकाळी ५.४५ ते ६.४५ दरम्यान बाजारात मुहूर्ताचे सौदे होणार आहेत.

Story img Loader