सोमवारी सायंकाळी जाहिर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी नफेखोरीचे व्यवहार केले. अस्थिरतेच्या वातावरणानंतर सेन्सेक्सने शतकी आपटी नोंदवली. तर निफ्टीने ८,०००चा स्तर सोडला.
१०९.२९ अंशासह सेन्सेक्स २६,२८३.०९ पर्यंत घसरला. तर ३०.६५ अंश घसरणीसह निफ्टी ७,९७१.३० पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने सोमवारी ८,००० चा टप्पाही सोडला.
मासिक तुलनेत ऑगस्टमध्ये सेन्सेक्सने १,८३१.४७ अंश घसरण नोंदविली आहे. तर निफ्टी ५६१.५५ अंशाने खाली आला आहे. दोन्ही निर्देशांकातील अनुक्रमे ६.५१ व ६.५८ टक्के ही घसरण गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत गुंतवणूकदारांना उत्सुकता कायम होती. व्यवहारानंतर अपेक्षित असलेल्या वाढीव दराच्या आशेवर बाजारात त्यांनी नफेखोरी करणे पसंत केले. अमेरिकी चलनाच्या तुलनेत रुपयाची भक्कमता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे सप्टेंबर मध्यास व्याजदर वाढीचे दिले गेलेले संकेत याचाही परिणाम बाजारावर झाला. आठवडय़ातील पहिल्या दिवशी प्रमुख चिनी निर्देशांकही नरमच होते.
२६,४६९.४२ या तेजीवरील टप्प्यासह सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा मुंंबई निर्देशांक सत्रात २६,५०४.७३ पर्यंत झेपावला. मात्र यानंतर त्याने घसरणीचा प्रवास करताना २६,२१५.१६ पर्यंत सत्रातील तळ गाठला.
मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग दोन व्यवहारात ६७७.७२ अंश वाढ राखली होती. यामुळे तो २६ हजारावर सहज पोहोचू शकला होता. सोमवारअखेर मात्र त्याला २६,५०० पुढील टप्पा गाठता आला नाही. निफ्टीने सोमवारी ८,००० चा अनोखा टप्पाही सोडला. व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,०४३.६० पर्यंत पोहोचल्यानंतर ७,९४७.९५ हा सत्राच्या तळातही आला. दिवसअखेरही त्याला ८,००० वर राहता आले नाही.
सेन्सेक्समध्ये औषध निर्मिती क्षेत्रातील समभाग दिवसअखेरही तेजीच्या यादीत राहिले. डॉ. रेड्डीज, सिप्ला, ल्युपिन, सन फार्मा यांच्या मूल्यात ३.५ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली गेली. तर ३.४५ टक्क्य़ांच्या रुपात भेल हा सार्वजनिक क्षेत्रातील समभाग सर्वाधिक घसरण नोंदवणारा ठरला. पाठोपाठ भारती एअरटेल, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, ओएनजीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, मारुती सुझुकी, स्टेट बँक, एचडीएफसी, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो अशा साऱ्यांचे मूल्य घसरले. सेन्सेक्समधील २० समभाग घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, स्थावर मालमत्ता, पायाभूत सेवा, भांडवली वस्तू, वाहन, ग्राहकपयोगी वस्तू, बँक क्षेत्रातील समभागांमध्ये मूल्य वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅपही ०.२५ टक्क्य़ापर्यंत घसरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा