देशातील संभाव्य दुष्काळाबाबत चिंता भांडवली बाजाराच्या सलग दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारात गहरी बनल्याचे बुधवारी दिसून आले. परिणामी ३५१.१८ अंश आपटीसह सेन्सेक्स २७ हजाराच्याही खाली उतरला. बुधवारी प्रमुख निर्देशांक २६,८३७.२० वर स्थिरावला. तर निफ्टीने ८,१०० ची पातळी जेमतेम सांभाळली. तरी दिवसअखेर १०१ अंश घसरणीसह तो ८,१०२.१० पातळीवर थांबला.
गेल्या दोन व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाची आपटी आता एक हजार अंशांहून अधिक झाली आहे. सेन्सेक्स आता चालू वर्षांतील ७ मे रोजीच्या २६,५९९.११ नीचांकानजीक आहे. तर निफ्टीचा बुधवारचा किमान प्रवास हा १७ डिसेंबर २०१४ च्या पातळीवर मागे फिरणारा ठरला आहे.
रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीचे स्वागत करण्याऐवजी तुटीच्या मान्सूनच्या अंदाजाबाबत भीतीची छायाच बाजारावर गडदताना दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारच्या व्यवहारात तब्बल ६०० हून अधिक अंशांनी गडगडला होता. बाजाराची बुधवारची सुरुवात काहीशी सकारात्मक राहिली. मात्र दिवस सरत गेला तशी व्याजदराशी निगडित समभागांमध्ये घसरण नोंदली गेली.
यातच देशाच्या सेवा क्षेत्राची मेमधील घसरण गेल्या जवळपास वर्षभराच्या तळात आल्याच्या एचएसबीसीच्या अहवालानेही घसरणीत भर टाकली. परिणामी सेन्सेक्स दिवसभरात २६,६९८.२६ पर्यंत तर निफ्टी ८,०९४.१५ पर्यंत खाली आला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.३८ व १.९८ टक्क्यांपर्यंत घसरले.
मुंबई शेअर बाजारात स्थावर मालमत्ता निर्देशांकाला सर्वाधिक, तब्बल ५.५४ टक्के घसरणीचा फटका बसला. त्यात यूनिटेक, एचडीआयएल, डीएलएफ लिमिटेड यांचे समभाग ३५.१७ ते २.४८ टक्क्यांपर्यंत आपटले. तर स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, कॅनरा बँक यांचेही समभाग मूल्य घसरले.
सेन्सेक्समध्ये टाटा पॉवर ६.१३ टक्क्याच्या घसरणीसह सर्वात पुढे राहिला. सोबतच आयटीसी, वेदांता, गेल, ओएनजीसी, भेल, हिंदाल्को, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, महिंद्र अॅण्ड महिंद्र या अन्य समभागांचाही घसरणीत समावेश राहिला. सेन्सेक्समधील २४ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.
नेस्ले डगमगला
‘मॅगी’मधील आरोग्यास उपायकारक घटकावरून उठलेल्या गदारोळाने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नेस्ले इंडियाचा समभाग बुधवारी मुंबई शेअर बाजारात ९.२१ टक्क्यांपर्यंत घसरला. यामुळे कंपनीचे बाजारातील मूल्य एकाच सत्रात ५,९४२ कोटी रुपयांनी रोडावले. नेस्ले इंडिया व्यवहारात तब्बल ११.८६ टक्क्यांनी घसरत ६,००० रुपयांवर आला होता. अखेर त्याला ६,१९१.१० रुपयांवर स्थिरावला.
यूनिटेकही ढेपाळला
ल्ल व्याजदराबाबत संवेदनशील समभागांमध्ये बुधवारीही घसरण झाली. सर्वाधिक अस्वस्थता नोंदली गेली त्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील यूनिटेकमध्ये. कंपनीचा समभाग व्यवहारात थेट ५१.६३ टक्क्यांपर्यंत आपटला. दिवसअखेर त्यात सुधार दिसला तरी मंगळवारच्या तुलनेत तो ३५.१७ टक्क्यांनी घसरता राहिला. एचडीआयएल, डीएलएफमध्ये अनुक्रमे ६.०३ व २.४८ टक्के घसरण झाली. एकूण स्थावर मालमत्ता निर्देशांक ५.५४ टक्क्यांनी घसरला.