तेलदरातील ताज्या उताराने जगभरात सर्वत्र पडझड
सलग तिसऱ्या दिवसातील सेन्सेक्सच्या घसरणीने स्थानिक भांडवली बाजाराला पुन्हा मंदीने घेरल्याचे बुधवारच्या व्यवहारांतून दिसून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा तीव्र उतरंड सुरू झाल्याने जागतिक स्तरावर सर्वच बाजारांमध्ये घबराटीचे सावट स्थानिक बाजारावरही दिसले. चीनच्या अर्थमंदीचा धक्का ताजा असताना, तेलाच्या दरातील मंदीसदृश अस्वस्थतेने समभाग बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण केली आहे. बाजारात विक्रीचा जोर राहिल्याच्या परिणामी निर्देशांकांत मोठी घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३१५.६८ अंशांनी (१.२९ टक्के )घसरून २४,२२३.३३ वर घरंगळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ९३.७५ अंशांनी (१.२६ टक्के) घसरून ७,३६१.८० वर बुधवारी बंद झाला. मुंबई शेअर बाजारात घसरणीचे स्वरूप सर्वदूर होते. प्रत्येक पाच घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत केवळ एका समभागांत वाढ दिसून आली. परिणामी बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप या मधल्या फळीतील समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १.३ टक्के असे घसरणीचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले.
मंगळवारच्या व्यवहारातही रिझव्र्ह बँकेच्या अर्थव्यवस्थेवरील कठोर भाष्यावर रूष्ट होत निफ्टी १००.४० आणि सेन्सेक्स २८५.८३ अशा साधारण एक टक्क्य़ांहून अधिक घसरणीसह बाजार बंद झाला होता. बुधवारच्या आणखी मोठय़ा घसरणीची भर पडून, निर्देशांकांनी पुन्हा दोन आठवडय़ापूर्वीच्या तळाला लोळण घेतली आहे. भारताच्या सेवा क्षेत्रात उभारी दर्शविणाऱ्या जानेवारीच्या पीएमआय सर्वेक्षणात आदल्या महिन्यांतील ५३.६ वरून ५४.३ अशी दमदार वाढही बाजारातील नकारात्मकतेला कमी करण्यास असमर्थ ठरली. सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ हिंदुस्तान युनिलिव्हर (२.६६ टक्के), टीसीएस (०.७७ टक्के) आणि सन फार्मा व बजाज ऑटो प्रत्येकी (०.२४ टक्के) असे चार समभाग वधारले. मुंबई शेअर बाजारातील ग्राहकोपयोगी उत्पादने वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा