निर्देशांकाची सलग चौथी आपटी; बाजाराची सप्ताहारंभीही निराशाच
भांडवली बाजारातील निराशा नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली. शतकी निर्देशांक घसरणीने मुंबई निर्देशांक सोमवारी २५,५०० नजीक येऊन ठेपला. १०८ अंश नुकसानासह सेन्सेक्स २५,५३०.११ वर थांबला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात १६.५० अंश घसरण झाल्याने निफ्टी ७,७६५.४० पर्यंत स्थिरावला. प्रमुख निर्देशांकाची ही सलग चौथी आपटी राहिली आहे.
जागतिक बाजारातील अस्वस्थता तसेच भारतात वस्तू व सेवा कर विधेयकासाठी सुचविण्यात आलेली करवाढ यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपयातील व्यवहारातील घसरण आणि अमेरिकी फेडरल रिझव्र्हची २००८ नंतरची संभाव्य पहिली व्याजदर वाढ याचेही सावट बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी अनुभवले गेले.
सोमवारच्या व्यवहारात सुरुवातीच्या तेजीमुळे सेन्सेक्स २५,७८५.५३ पर्यंत झेपावला होता. मात्र यानंतर तो लगेचच नकारात्मक प्रवास करता झाला.
सेन्सेक्समधील १६ कंपन्यांचे समभाग घसरले. तर हीरो मोटोकॉपचा प्रवास स्थिर राहिला. घसरलेल्या समभागांमध्ये कोल इंडिया, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज, वेदांता यांना अधिक फटका बसला.
तर सुरवातीच्या व्यवहारातील तेजीमुळे सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ल्युपिन, टाटा स्टील, एचडीएफसी, गेल, विप्रो हे दिवसअखेरही वाढते राहिले. मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, तेल व वायू, वाहन, आरोग्यनिगा हे निर्देशांक घसरणीत सर्वात पुढे होते.
गेल्या चार व्यवहारातील सेन्सेक्समधील घसरण ६३९.३० पर्यंत विस्तारली गेली आहे. यामुळे मुंबई निर्देशांकाचा सोमवारचा तळ हा १८ नोव्हेंबरनंतरचा किमान स्तर राहिला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गेल्याच आठवडय़ात ७,९०० व ७,८०० चाही स्तर सोडला. सोमवारी निर्देशांक ७,८२५.४० पर्यंत उंचावल्यानंतर दिवसअखेर ७,७६५.४० पर्यंत घसरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा