माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील अग्रणी इन्फोसिसला महसुली उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात आलेले अपयश व येत्या वर्षांच्या उत्पन्न व नफ्याच्या आकडय़ांनी केलेल्या अपेक्षाभंगामुळे, इन्फोसिसच्या समभागाच्या भावाने २१.३३ टक्क्यांनी आपटी खाल्लीच, तर शुक्रवारी मुंबई शेअर निर्देशांक- सेन्सेक्सच्या २९९.६४ अंशांच्या घसरणीसही ते प्रमुख कारण बनले.
भारतीय कंपन्यांच्या निकाल हंगामाला इन्फोसिसच्याच निकालाने सुरुवात होते, तसेच अमेरिका-युरोपातील आर्थिक हलाखीचा भारतातील सॉफ्टवेअर सेवा निर्यातीवर परिणामकारकता समजावून घेण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण असलेल्या इन्फोसिसच्या वित्तीय कामगिरीबरोबरच, आगामी वाटचालीविषयी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या संकेतांकडे गुंतवणूकदार वर्गाचे लक्ष होते. या निकालांबाबत बाजारात सकारात्मकताही होते आणि परिणामी गेले दोन आयटी निर्देशांक तसेच प्रमुख निर्देशांकांनीही उसळी मारली होती. परंतु साऱ्या अपेक्षांवर पाणी सोडणारे प्रत्यक्षात निकाल व भविष्याविषयी निराशाजनक संकेत शुक्रवारी सकाळी इन्फोसिसकडून जाहीर करण्यात आले. या घोर अपेक्षाभंगाचे एकूण गुंतवणूकदार वर्गात विपरीत पडसाद उमटताना दिसले. सेन्सेक्सच्या त्रिशतकी घसरणीबरोबरच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ६५.४५ अंश खाली येऊन ५,५५० या तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळीखाली रोडावला.
मार्च महिन्यात किरकोळ किमतीवर आधारीत महागाई निर्देशांकात पाच महिन्यांनंतर दिसून आलेली घट आणि फेब्रुवारीसाठीच जाहीर झालेले सकारात्मक औद्योगिक उत्पादनाचे आकडे या आजच्या तुलनेने अनुकूल घटनाक्रमांनी बाजारातील पडझड काही प्रमाणात रोखण्यास हातभार लावला. तथापि इन्फोसिसच्या घसरणीची लागण होऊन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, एचसीएल टेक, विप्रा, टेक महिंद्र यांचे भाव कमालीचे गडगडले. प्रमुख निर्देशांकात सामील स्टेट बँक, रिलायन्स, आयटीसी यांचे भाव मात्र वाढले.
सेन्सेक्समधील ३० पैकी १३ समभागांचे भाव सपाटून घसरले. एकटय़ा इन्फोसिस या मोठा भारांक असलेल्या समभागातील जवळपास २२ टक्क्यांच्या घसरणीने सेन्सेक्सला आज ३६५ अंश गमवावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा