बाजारमूल्य अग्रणी रिलायन्सच्या जोमदार मुसंडीच्या बळावर शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकाचा सलग तिसऱ्या दिवशी बहर सोमवारी कायम राखला. युरोपीय बाजारांच्या दमदार सुरुवातीने ‘सेन्सेक्स दौडी’ला आज हातभार लावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सप्ताहरंभी सकाळपासून जवळपास शतकी वाढ राखून होता. परंतु दिवसअखेर काहीशी आघाडी गमावून तो ६२.८७ अंशांच्या वाढीसह २०,१०१.८२ वर स्थिरावला. आधीच्या दोन दिवसात सेन्सेक्सने २२१ अंश कमावले आहेत. २०,१०० हा उच्चांक सेन्सेक्सने दोन वर्षांपूर्वी ६ जानेवारी २०११ रोजी कमावला होता, त्याने तो आज पुन्हा सर केला.
बरोबरीने निफ्टीनेही आणखी १७.९० अंशांची कमाई करीत ६,०८२.३० या स्तरावर दिवसअखेर विश्राम घेतला. प्रारंभी इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक पाठोपाठ रिलायन्स, आयटीसी या मोठे भारमान असलेल्या कंपन्यांच्या डिसेंबर तिमाही निकालांमधील दमदार कामगिरीने यंदांच्या निकालाच्या हंगामाची उत्साही सुरुवात झाली असून त्याचे प्रत्यंतर बाजारातील निर्देशांकांच्या दौडीमध्ये उमटताना दिसत आहे.

रिलायन्स भरारी
रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सोमवारी पुन्हा २.३५ टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्सच्या आजच्या ६२ अंशांच्या वाढीत एकटय़ा रिलायन्सच्या समभागातील मुसंडीने ४० अंशांचे योगदान दिले आहे. रिलायन्स ही आजच्या घडीला शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. रिलायन्स सरलेल्या शुक्रवारी ऑक्टोबर-डिसेंबर २०१२ या तिमाहीत नफ्यात घसघशीत २४ टक्क्यांची वाढ दर्शविणारी कामगिरी जाहीर केली आहे. त्यातच सरकारने पेट्रोलबरोबरीनेच डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याचा घेतलेला निर्णय रिलायन्स समभागाचा भाव वाढविण्यास हातभार लावणारा ठरला आहे.

Story img Loader